Pune bypoll election: कसबा चिंचवड निवडणुकीत प्रचाराचा फीवर; नेतेमंडळीचा ताव कधी वडापाव तर कधी चितळेंच्या बाकरवडीवर
भाजप आणि राष्ट्रवादी प्रचाराला चांगलेच भिडले आहे. या सगळ्या प्रचारादरम्यान नेते मंडळींनी कधी वडापाव तर कधी चितळेंच्या बाकरवडीवर ताव मारताना दिसत आहे.
Pune bypoll election: कसबा आणि चिंचवडमध्ये (Pune Bypoll Election) पोटनिवडणुकीची जोरात तयारी सुरु आहे. या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी अनेक नेते मंडळी रस्त्यावर उतरले आहे. कसब्यात सध्या पोटनिवडणुकीचं वातावरण तंग आहे तर चिंचवडमध्ये तिरंगी लढत असल्याने भाजप आणि राष्ट्रवादी प्रचाराला चांगलेच भिडले आहे. या सगळ्या प्रचारादरम्यान नेते मंडळींनी कधी वडापाव तर कधी चितळेच्या बाकरवडीवर ताव मारताना दिसत आहे. निवडणुकांचा प्रचार करुन दमलेल्या कार्यकर्त्यांना हल्ली मटण, चिकनच्या पार्ट्यां द्याव्या लागतात. पूर्वी मात्र भेळ, भडंग, वडापाव दिला तरी समाधान मानला जायचा. लुप्त झालेल्या प्रथेची आठवण चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरलेल्या रोहित पवारांनी करुन दिली. प्रचार म्हटलं की अनेक कार्यकर्ते, नेते मंडळी घोषणाबाजी आणि मोठ्या पदयात्रा काढल्या जातात. सध्या पुण्यातील दोन्ही मतदारसंघात दिवसभर हेच चित्र बघायला मिळत आहे. यातच अनेक नेते मंडळीदेखील या प्रचाराच्या जल्लोषात सहभागी झाले आहेत. कसब्यातील प्रचारादरम्यान चंद्रकांत पाटलांनी पुण्याची राज्यात फेमस असलेल्या चितळेंच्या बाकरवडीवर ताव मारला आहे. तर तिकडे चिंचवडमध्ये प्रचारासाठी राष्ट्रवादीची तरुण तोफ आमदार रोहित पवार यांनी थेट रस्त्यावरील खमंग आणि चविष्ट वडापावावर ताव मारला.
भाजपची तगडी फौज कसब्यात
चंद्रकांत पाटील पोटनिवडणुक जाहीर झाल्यापासून जय्यत तयारीला लागले आहेत. भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हेमंत रासनेंच्या प्रचारासाठी भाजपची तगडी फौज कसब्यातील रस्त्यांवर दिसत आहे. त्यातच अमित शाह देखील येणार आहेत. त्यांच्या खासगी कार्यक्रमांना ते हजेरी लावणार असले तरी ओंकारेश्वर मंदिराचं दर्शन घेणार आहे. हे मंदिर देखील कसबा मतदारसंघात येतं. त्यामुळे प्रचारात जरी सहभागी होणार नसले तरी मंदिरात येत असल्याने अमित शाह मतदारसंघात येणार आहे. त्यासोबतच ते खासदार गिरीश बापटांचीही भेट घेणार आहे. त्यामुळे अर्थातच अमित शाह यांचा हा दौरा हेमंत रासनेंसाठी महत्वाचा आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये तिरंगी लढत
तिकडे चिंचवडमध्ये तिरंगी लढत होणार आहे. राष्ट्रवादीचे नाना काटे, भाजपच्या अश्विनी जगताप आणि सगळीकडे सध्या ज्या उमेदवाराची चर्चा सुरु आहे आणि ज्या उमेदवाराने राष्ट्रवादी आणि भाजपचं टेन्शन वाढवलं आहे असे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिहेरी लढत होणार आहे. या तिघांचा जोरदार प्रचार सुरु आहे. तिघांकडूनही प्रचारासाठी मोठ मोठे नेते येत आहेत. रॅली, सभा, पदयात्रा काढल्या जात आहे. या तिरंगी लढतीत नेमकं कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.