Chandrakant Patil : बाबरी मशीद पाडली तेव्हा कोणीही शिवसैनिक म्हणून नाही तर हिंदू म्हणून होते आणि विश्व हिंदू परिषद सगळ्यांचं नेतृत्व करत होती, असं स्पष्ट मत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant patil)  यांनी व्यक्त केलं आहे. बाबरी मशीदीवर केलेल्या वक्तव्यावरुन उद्धव ठाकरे यांनी चांगलाच सामचार घेतला. बाळासाहेब ठाकरे यांचं महत्व कमी करण्याची भाजपली चाल आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं आहे. 


चंद्रकांत पाटील म्हणाले की, "हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मुंबईतील हिंदू जिवंत राहिला. माझ्या मनात बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भात कधीही अनादर नव्हता. बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुंसाठी काम केलं आहे. त्यांच्याबाबतीत माझ्या मनात कधीही अश्रद्धा नव्हती. बाळासाहेबांचा अपमान करणं किंवा त्याचं महत्व कमी करण्यासारखं माझ्या मनातही कधी येणार नाही. यापूर्वी अनेक वेळा बाळासाहेबांचं नाव मी आदरानेच घेतलं आहे आणि ऋणही व्यक्त केलं आहे."


... त्यावेळी सगळे हिंदूच होते!


अयोध्या ही राम जन्मभूमी आहे हे प्रस्थापित करण्याचं आंदोलन 1983 पासून सुरु झालं. त्यावेळी विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली झालं. त्यासोबतच बजरंग दल आणि दुर्गावाहिनी या संघटनादेखील होत्या. त्यावेळी झालेली सर्व आंदोलनं ही विश्व हिंदू परिषदेच्या नावाखाली झाली होती. त्यामुळे बाबरीचा ढांचा पडताना कोण शिवसेनेचा आणि कोण कुठला असा काहीही भेद नव्हता. त्यावेळी सगळे हिंदू होते. हे सगळे विश्व हिंदू परिषदेच्या बॅनरखाली होते. त्याचकाळात स्वर्गीय आनंद दिघेंनी अयोध्या मंदिर होण्यासाठी सोन्याची विट पाठवली होती. यावेळी कोणताही भेद नव्हता सगळे हिंदू होते आणि त्यांनी ढांचा पाडला हा महत्वाचा मुद्दा असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.


बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदू माणसावरचं ऋण कोणी पुसूच शकत नाही!


"बाळासाहेब ठाकरे, मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझे चांगले संबंध आहेत. लहानपणापासून बाळासाहेबांना पाहण्याची आणि त्यांच्यासोबत राहण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्यांच्यासंदर्भात कायम आदर आहे. कोणत्याही प्रकरणात काहीही आरोप मी सहन करणार नाही. त्यांच्याबाबत असलेला आदर आजचा नाही तर तो लहानपणापासूनच आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदू माणसावरचं ऋण कोणी पुसूच शकत नाही," असंही त्यांनी खडसावून सांगितलं.


मुख्यमंत्र्यांचा फोन आला...


या सगळ्या प्रकारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मला फोन आला. बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत माझ्या मनात कोणताही अनादर नाही, असं सांगण्याचा सल्ला दिला. मात्र यापूर्वी प्रत्येकवेळा मी बाळासाहेब ठाकरे यांचा आदर केला आहे आणि तो आदर कायम असेल असं त्यांनी म्हटलं.