Girish Bapat Pune By Election : गिरीश बापट (Girish bapat) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारीची सध्या राजकीय क्षेत्रात चर्चा सुरु आहे. त्यात भाजपकडून आणि महाविकास आघाडीकडून या निवडणुकीसाठी तयारी सुरु झाली आहे. मात्र कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सुंदोपसुंदी पाहायला मिळत आहे. कॉंग्रेसच्या ताब्यातील या जागेवर राष्ट्रवादीने दावा केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीत चांगलीच रस्सीखेच सुरु आहे. 


राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे पोस्टर्स भावी खासदार म्हणून सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकीतील उमेदवारीत ट्विस्ट पाहायला मिळाला. लोकसभेची जागा ही कॉंग्रेसची आहे, असा दावा कॉंग्रेसकडून केला जात आहे. मात्र राष्ट्रवादीच्या जगतापांच्या पोस्टर्सनंतर या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीदेखील इच्छुक असल्याचं दिसून आलं. त्यानंतर जगताप यांनी देखील मला संधी मिळाली तर मी निवडणूक लढवेन अशी उघडपणे भूमिका घेतली. 


तर मी निवडणूक नक्की लढवेन : प्रशांत जगताप


प्रशांत जगताप म्हणाले की, "लोकसभेच्या जागेसाठी मी इच्छुक आहे. त्यामुळे भावी खासदार म्हणून कार्यकर्त्यांनी पोस्टर्स सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. मला जर महाविकास आघाडीने आणि राष्ट्रवादीने लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी संधी दिली तर मी नक्की निवडणूक लढवेन. "उमेदवारी दिली नाही तर पक्षाच्या आदेशानुसार कॉंग्रेसच्या नेत्यासाठी काम करेन," असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.


ही जागा कॉंग्रेसच लढवणार : अरविंद शिंदे


कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनीदेखील या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मागील अनेक वर्षांपासून ही जागा काँग्रेस लढवत आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत देखील महाविकास आघाडीकडून ही जागा कॉंग्रेसच लढवणार आहे. या पोटनिवणुकीत कॉंग्रेसकडून उमेदवारीसाठी दोघांच्या नावाची चर्चा सुरु आहे. त्यात अरविंद शिंदे आणि मोहन जोशी यांच्या नावाचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात एकच जागा कॉंग्रेस लढवत असते. बाकी लोकसभेच्या जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून लढवण्यात येतात त्यामुळे कॉंग्रेस या जागेवर आपला दावा राखून आहे.


भाजपकडून कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या रस्सेखेचवर टीका...


कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या रस्सेखेचीवर भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी टीका केली आहे. पोटनिवडणुकीच्या जागेवरुन राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरु आहे. उमेदवारीसाठी सुरु असलेली चढाओढ चुकीची असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर काहीच दिवसात पोटनिवडणूक जाहीर होऊ शकते. या पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारी कोणाला दिली जाते याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.