पुणे : जिल्ह्यातील बेलसरमध्ये झिका व्हायरसचा रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. केंद्रीय पथकाकडून आज (गुरुवार 5 ऑगस्ट) या गावची पाहणी करुन प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. हे पथक बेलसर गावची पाहणी केंद्राकडे अहवाल पाठवणार आहे. 30 जुलै रोजी राज्यात पहिल्यांदा झिका व्हायरसचा रुग्ण आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर राज्यासह जिल्हा प्रशासनाची आरोग्य यंत्रणा सतर्क होऊन या गावात तातडीने उपाययोजना सुरू केल्या होत्या. 


राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसांपासून केंद्रीय पथक राज्यात दाखल झाले आहे. त्यांनी दोन दिवस जिल्हा प्रशासनाशी बैठकांचे सत्र केल्यानंतर आज बेलसर गावात येऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी स्थानिक प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची देखील त्यांनी माहिती घेतली. याशिवाय घरोघरी जावून ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच ग्रामस्थांनी घ्यावयाच्या काळजीबाबत माहिती दिली. 
 
दिल्लीतून सर्व्हेक्षण करण्यासाठी कुटुंब कल्याण मंत्रालयानं हे पथकं पाठवलं आहे. दिल्लीच्या लेडी हार्डींग वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिल्पी नैन, डॉ. हिंमत सिंग यांच्यासह राष्ट्रीय हिवताप संशोधन केंद्रातील किटकतज्ज्ञांचा या पथकात समावेश आहे. बेलसर गावाची पाहणी करुन हे पथक केंद्राला अहवाल देणार आहे. तीन सदस्य असलेल्या या केंद्रीय पथकाने झिका बाधित पुरंदरच्या बेलसर गावात दाखल झाल्यानंतर पहिल्यांदा गावातल्या स्थानिक प्रशासन आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत बैठक केली. या बैठकीत केंद्रीय पथक स्थानिक अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आहे.


या पथकातील हिंमत सिंग यांनी सांगितले, की झिका व्हायरसने संसर्ग झालेली महिला बेलसरमध्ये पहिल्यांदा आढळल्याने आम्ही या भागाचा दौरा करून राज्य सरकारने योग्य उपाययोजना राबवल्या आहेत का? या संदर्भात केंद्र सरकारला अहवाल देणार आहोत. यापूर्वी केरळमध्ये झिका व्हायरसचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळले होते. झिका व्हायरसमध्ये आढळलेल्या रुग्णांमध्ये लक्षणे एकसारखी असून झिका व्हायरस वाढण्यासाठी मच्छर कारणीभूत आहेत. त्यांना कंट्रोल करणे आवश्यक आहे. या ठिकाणी स्थानिक प्रशासनाने योग्य खबरदारी घेत उपाय योजना राबवल्या असल्याने या पथकातील शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केले. 


डॉ. शिल्पी नैन यांनी सांगितले की, गर्भवती महिलांमध्ये हा संसर्ग विकसनशील गर्भास गंभीरपणे हानी पोहोचवू शकतो आणि जन्मजात विसंगती होऊ शकतात. झिका व्हायरस हा डासांमुळे होतो. त्यामुळे गर्भवती महिलांनी ज्यादा विशेष काळजी घेण्याची गरज आहे.