पुणे : पुणे महापालिकेकडून पुण्यातील धनकवडी भागातील महापालिकेच्या मैदानात दोन कोटी रुपये खर्च करून प्रभू श्रीरामांचे शिल्प उभारण्याचा ठराव मंजूर करण्यात आलाय. भाजपच्या नगरसेविका वर्षा तापकीर यांनी त्यासाठी मागणी केली होती.  त्यानंतर भाजपच्या ताब्यातील महापालिकेकडून श्रीरामांचे शिल्प उभारण्याचा ठराव मंजूर करण्यात आलाय.  भाजपच्या या निर्णयानंतर विरोधी पक्षांनी आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप श्रीरामाच्या नावाचा वापर करत असल्याचा आरोप केलाय. मैदानात दैवतांची मुर्ती उभारणे नियमबाह्य असल्याच राष्ट्रवादी कॉंग्रेसने म्हटलं आहे.  तर महापालिकेकडून करण्यात आलेला हा ठराव बालिश असल्याचे सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी म्हटलं आहे.  रामाची मुर्ती उभारावी. पण त्याचा राजकरणासाठी उपयोग करु नये असं शिवसेनेने म्हटलं आहे. 


काय आहे प्रस्ताव 
पुण्यातील धनकवडी भागातील महापालिकेच्या मैदानात दोन कोटी रुपये खर्च करून प्रभू श्रीरामांचे शिल्प उभारण्याचा ठराव मंजूर करण्यात आलाय. भाजपच्या नगरसेविका वर्षा तापकीर यांनी त्यासाठी मागणी केली होती.  त्यानंतर भाजपच्या ताब्यातील महापालिकेकडून श्रीरामांचे शिल्प उभारण्याचा ठराव मंजूर करण्यात आलाय. धनकवडी भागातील आंबेगाव पठारमध्ये असलेल्या दीड एकर जागेवर श्रीरामांचं शिल्प बनवण्यासाठी दोन कोटी रुपये मंजूर करावेत, असा प्रस्ताव नगरसेविका वर्षा तापकीर यांनी केली होती.   


विश्वंभर चौधरी यांचा गंभीर आरोप
सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी फेसबुक पोस्ट करत या ठरावाचा विरोध केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, पुण्याच्या महापालिकेत हे असे बाष्कळ ठराव येतात तेव्हा पुणेकर असल्याची लाज वाटते.  कोरोनानं लोकांची घरं उजाडली आहेत. रोजगारासाठी लोक तरसत आहेत. पुणे महापालिकेच्या शाळा आणि दवाखाने यांच्याकडे कोणत्याही आधुनिक सुविधा नाहीत. मुठा नदी मरायला टेकली आहे आणि यांना दोन कोटींचा रामाचा पुतळा आपल्या पैशातून बांधायचा आहे का तर रामाला यांनी आपला देव ठेवला नाही, यांच्या पक्षाचा ब्रॅन्ड ॲम्बॅसॅडर बनवला आहे, असं चौधरी यांनी म्हटलं आहे. त्यांनी म्हटलंय की,  हेच फुले, टिळक, आगरकरांचं बुद्धीवादी शहर आहे असं आता कोणी म्हणणार नाही. ती ओळखही यांच्या लीलांमुळे पुसून गेली आहे.  दोन कोटी खर्च कराच पुतळ्यावर, महापालिका निवडणूक जवळ आहे. आम्ही नागरिक म्हणून तुमच्या विरोधात प्रचाराला उतरू. एवढी राम भक्ती असेल तर नगरसेवकांनी स्वतःचे भरलेले खिसे रिकामे करून दोन कोटी रूपये उभारावेत.  राम पुतळा आणि मूर्तीत नसतो. लोकांच्या हृदयात असतो. तो वंदनीय देव आहे हिंदूंचा तुमचा प्रचारक नाही. हिंमत असेल तर घाम गाळून जिंकायला शिका, रामाच्या जीवावर किती वर्ष मत-भिक्षा मागणार? असा सवाल चौधरींनी केला आहे.