मुंबई/पुणे : देशभरात आज बुद्ध पौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळत आहे. त्यानिमित्ताने अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तर पुण्यात धम्म पहाट महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
बुद्ध पौर्णिमेनिमित्त मुंबईच्या चांदीवलीमध्ये लोकांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक दिलीप लांडे यांनी मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते. तुंगागांव-पवई पासून साकीविहार रोडवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते काजूपाडा (कुर्ला) पर्यंत या रॅलीचा मार्ग होता. 10 किलोमीटरहून लांबपर्यंत ही रॅली काढण्यात आली.
रॅलीदरम्यान निळे झेंडे आणि निळ्या टोप्यांमुळे संपूर्ण वातावरण निळे झालेले पाहायला मिळाले. दरम्यान रॅलीत सहभागी झालेल्या तरुणांनी परिसरातील सर्व बुद्ध विहारांमध्ये मानवंदना दिली.
मुंबईप्रमाणे पुण्यातही बुद्ध पौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळाला. बुद्ध पौर्णिमेनिमित्त पुण्यात धम्मपहाट महोत्सवाचे आय़ोजन करण्यात आले होते. या महोत्सवात गायक राहुल देशपांडे यांची गाणी आणि रोणु मुजुमदारांच्या बासरीवादनाची झलक पाहायला मिळाली.
वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी हा सण साजरा केला जातो. या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना घडल्या आहेत. शांतीचे प्रतीक, मानवतेचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांची ही पौर्णिमा त्यांच्या अनुयायांसाठी सर्वात मोठ्या उत्सवासारखी असते.
जगातील सर्व दुःख संपवण्यासाठी गौतम बुद्धांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. दुःखाचे मूळ नाहीसे करण्याचा मार्ग व ज्ञानप्राप्ती झाल्याने वैशाख पौर्णिमा ही बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.