पुणे : पुण्यात रेल्वे रुळांवर घातपाताचे प्रयत्न होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसात पुणे रेल्वे विभागाअंतर्गत येणाऱ्या अनेक ठिकाणी रेल्वे रुळावर लोखंडी तुकडे ठेवून मोठा अपघात घडवून आणण्याचे प्रयत्न होत असल्याची माहिती पुणे रेल्वे विभागाने दिली आहे.
पुणे रेल्वे मार्गावर गेल्या 3-4 महिन्यात जवळपास 8-10 वेळा घातपाताचे प्रयत्न झाले आहेत. मात्र सुदैवाने रेल्वे अधिकारी आणि लोको पायलट यांच्या सतर्कतेमुळे मोठे अपघात टळले आहेत. एप्रिल महिन्यात दोन विविध ठिकाणी अज्ञातांनी लोखंडी तुकडे रेल्वे ट्रॅकवर ठेवून अपघात घडवण्याचा प्रयत्न केला.
काही दिवसांपूर्वीच कामशेत येथे हैद्राबाद-मुंबई एक्सप्रेसलादेखील टार्गेट करण्यात आलं होतं. हजारो लोक दररोज या मार्गावर रेल्वेने प्रवास करतात. अशा प्रकारच्या घटनांमुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे.
त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून देखील कुणालाही रेल्वे रुळांवर लोखंडी वस्तू ठेवणारा व्यक्ती किंवा संशयास्पद हालचाल दिसल्यास लगेच पोलिसांना कळवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.