(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Pawar: 'भाजप मावळमध्ये घड्याळाला नाही तर तुतारीला मदत करणार', राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचा गौप्यस्फोट, नेमकं काय म्हणाले?
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीआधी महायुतीतील वाद आता चव्हाट्यावर यायला सुरूवात झाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादीची धुसफूस समोर आली आहे.
पुणे: मावळ विधानसभेत भाजप गावोगावी फिरून अजित पवारांच्या (Ajit Pawar NCP) राष्ट्रवादीला मदत करायची नाही, असा प्रचार करत आहेत. पण शरद पवारांनी उमेदवार उभा केला तर हे तुतारीचा प्रचार करण्याच्या तयारीत आहेत. असा गौप्यस्फोट अजित पवार गटाचे मावळमधील आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी केला आहे. सुनील शेळकेंचा प्रचार न करण्याचा ठराव भाजपने आधीचं केला आहे. भाजपकडून इथं माजी आमदार बाळा भेगडेंनी आधीचं शड्डू ठोकलेले आहेत. अशातच शेळकेंनी (Sunil Shelke) हा दावा केल्यानं मावळ महायुतीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना शेळकेंनी हा गौप्यस्फोट केला आहे.
काय म्हणालेत सुनील शेळके?
भाजप पक्षाची काही मंडळी गावागावात जाऊन सांगत आहे, आपण राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवारांना मदत करायची नाही, असं म्हणत आहेत. जे मागच्या दीड वर्षांपासून कधीही बोलले नाहीत. लोकसभा निवडणुकीला राष्ट्रवादी पक्ष महत्त्वाचा आहे, अजित पवारांचं काम चांगलं आहे, आमदारांचं काम चांगलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आपल्यासोबत आल्याने ताकद मिळणार आहे, आपण सर्वांनी महायुतीचा धर्म पाळून काम केलं पाहिजे. लोकसभा निवडणुकीला जे बोलत होते. ते आता गावागावात जाऊन सांगत आहेत, अजितदादाला मदत करायची नाही, हे ते आज बोलत आहेत, या वक्तव्यावर वास नक्की कुठेतरी आला आहे.
कार्यकर्त्यांना भाजपच्या पक्षाने भडकवून द्यायचं, त्यांना संभ्रमित करायचं. आपण पक्षाचे कसे निष्ठावंत आहोत, ते दाखवून द्यायचं, अजून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाचा उमेदवार उभा राहिला तर त्याला मदत झाली पाहिजे हा एक त्यांचा प्रयत्न असणार आहे, असं माझं मत आहे, असं सुनील शेळकेंनी (Sunil Shelke) म्हटलं आहे.
पिंपरीत अजित पवार गटाचा प्रचार न करण्याचा ठराव, भाजपचा अण्णा बनसोडेंना विरोध
पिंपरी विधानसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रचार करायचा नाही. असा ठराव करत भाजपने थेट आमदार अण्णा बनसोडेंना (Anna Bansode) विरोध दर्शवला आहे. लोकसभेत कमळाचा उमेदवार मिळाला नाही आता आम्हाला कमळाचाचं उमेदवार हवा अशी आग्रही भूमिका बैठकीत एकमुखाने मांडण्यात आली. भाजपचे विधान परिषदेचे आमदार उमा खापरे आणि अमित गोरखेंसह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादी विरोधी सूर उमटला. लोकसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने महायुतीचा प्रचार केला नाही मग आपण घडाळ्याचा प्रचार का करायचा? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. ठरल्याप्रमाणे ही मागणी महायुतीच्या जागावाटपाच्या बैठकीपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंकडे केली जाणार आहे.