चंद्रकांत पाटील यांचे अजब वक्तव्य, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू वोट बॅंक विकसित केली, वाजपेयी-मोदींकडून कळस!
BJP leader Chandrakant Patil controversy :भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
BJP Chandrakant Patil : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या निवडणूक तिकिटांबाबत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी चर्चेचा रोख हिंदू व्होटबँकेपर्यंत नेला. 'छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक विकसित केली, वाजपेयी-मोदींनी त्यावर कळस चढवला' असल्याचे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावरून नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पुण्यातील भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी उमेदवारांच्या निवडणूक तिकिटाबाबत भाष्य केले. तिकिट हे पक्षाचे असते. व्होट बँक पक्षाची असते. व्होटबँक ही वर्षानुवर्षे मेहनत घेऊन तयार केलेली असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी ही हिंदुत्वाची व्होट बँक तयार केली. अलिकडच्या काळात ही व्होट बँक अटल बिहारी वाजपेयी, आडवाणी, मोदी यांनी त्यावर कळस चढवला असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले.
पाहा व्हिडिओ, चंद्रकांत पाटील नेमके काय म्हणाले?
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी म्हटले की, चंद्रकांत पाटील यांनी असे वक्तव्य करून तारे तोडले आहेत. शिवरायांचा अवमान करणारी ही भाजपाची छिंदम प्रवृत्ती आहे. व्होट बॅंकेच्या हिन राजकारणाशी शिवरायांचा संबंध जोडता? असा सवालही त्यांनी केला. शिवराय हे सद्विचारांचे प्रतिक आहेत व भाजपा कुविचारांचे- त्यामुळे तुलना पातकच असून पाटील यांनी माफी मागण्याची मागणी सावंत यांनी केली.
अमोल मिटकरी यांनी म्हटले की, पाटील यांच्या विधानाचे कोणीही समर्थन करणार, त्यांचे इतिहासाबाबत किती ज्ञान आहे, हे तपासण्याची आवश्यकता आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना हिंदूपुरतं सीमित करण्याचे काम भाजप-संघाकडून सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य उभारले. चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य बालिश असल्याची टीका मिटकरी यांनी केली.
पाहा व्हिडिओ: चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य गंभीर, मिटकरी यांची टीका