पुणे: दरवर्षीप्रमाणे यंदाही 6 जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील किल्ले वाफगाव येथे महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांचा राज्याभिषेक दिन आणि गड संवर्धन भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहाने पार पडला. यावेळी गजी नृत्य, मर्दानी खेळ, ढोल वादन आणि भंडाऱ्याच्या उधळणीने या कार्यक्रमात रंगत आणली. सर्व 18 पगड जातीच्या लोकप्रतिनिधींना यंदाच्या राज्याभिषेकाची संधी देण्यात आली होती, हे यंदाच्या कार्यक्रमाचे वेगळेपण. होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंहराजे होळकर (Bhushansiha Raje Holkar) यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य राज्याभिषेकाचा कार्यक्रम पार पडला. 


या कार्यक्रमासाठी यशवंतराव महाराजांवर (Maharaja Yashwantrao Holkar) आणि होळकर घराण्यावर प्रेम करणारे समाज बांधव, भगिनी, अनेक ऐतिहासिक घराण्यांचे वंशज, सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत मान्यवर, प्रशासकीय अधिकारी, अठरा पगड जातीतील विविध संघटना, इतिहास प्रेमी मोठ्या संख्येने राज्य व देशभरातून उपस्थित होते. भूमीपूजनासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, सुनील देवधर, खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, माजी मंत्री आमदार प्रकाश आवाडे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, लष्कराचे काही अधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.


राजराजेश्वर चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांचे भारतीय इतिहासातील योगदान अद्वितीय आहे. जगभरात अजिंक्य मानल्या जाणाऱ्या इंग्रजांचा त्यांनी अनेक वेळा पराभव केला. भारतीय स्वातंत्र्य लढ्याची बीजं लढवय्या मनात पेरली.  राजस्थान, माळवा, पंजाब, दिल्ली इतक्या भल्या मोठ्या प्रदेशात महाराजांनी इंग्रजांविरुद्ध युद्धे लढली. 


भारतमातेच्या रक्षणासाठी आपसातील मतभेद विसरुन देशभरातील सर्व राजा महाराजांना एकत्र येण्याचे आवाहन केले. इंग्रज यशवंतराव महाराजांना भारताचा नेपोलिअन म्हणत. महाराजांशी बिनशर्त संधी करण्याची इंग्रजांची मानसिकता होती. मात्र महाराजा यशवंतराव होळकर यांना स्वतंत्र हिंदुस्थान हवा होता. हा इतिहास तरुणांना प्रेरणादायी आहे.


या पराक्रमी देशभक्त राजाचे जन्मस्थान असलेला वाफगावचा भुईकोट किल्ला सुभेदार मल्हारराव होळकर यांनी बांधून घेतला होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या वास्तव्याने ही वास्तू पावन झाली आहे. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार वाफगावचा किल्ला आज 250 वर्षांनंतर संवर्धित होत आहे हा सर्वांसाठी एक ऐतिहासिक दिवस आहे. यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, त्यामुळे परिसराचा विकास होईल, ग्रामस्थांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, पर्यटन वाढेल असं आवाहन होळकर राजघराण्याचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांनी व्यक्त केली. त्यांच्याच नेतृत्त्वात 'होळकर राजपरिवारा' तर्फे राजराजेश्वर चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले जाते.


ही बातमी वाचा: