Sharad Mohol Murder Case Update : कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) हत्येचं EXCLUSIVE सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) एबीपी माझाच्या हाती आलं आहे. शुक्रवारी पुण्यात शरद मोहोळ याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शरद मोहोळ हत्येची धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये (Sharad Mohol Case CCTV Video) चित्रित झाली असून याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. शुक्रवारी शरद मोहोळच्या लग्नाचा वाढदिवस होता.


शरद मोहोळने (Sharad Mohol Case Update) त्याच्या पत्नीसोबत वाढदिवस साजरा केला. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्येचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. यामध्ये स्पष्ट दिसत आहे की, शरद मोहोळसोबत सावलीप्रमाणे चालणाऱ्या त्याच्या साथीदारांनीच त्याच्यावर पिस्तुलातूव गोळ्या झाडल्या, ज्यामुळे त्याचा अंत झाला.


नामांकित वकीलांचा सहभाग


शरद मोहोळ हत्या प्रकरणात दोन नामांकित वकीलांचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे. रवींद्र पवार आणि संजय उड्डाण अशी वकीलांची नावे आहेत. दोघेही शिवाजी नगर सत्र न्यायालयात प्रँक्टीस करतात, अशी माहिती समोर आली आहे. पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांनाही शुक्रवारी रात्री इतर आरोपींसोबत अटक केली आहे. आरोपींना कट रचण्यात आणि त्यांना पळून लावण्यात या वकिलांनी मदत केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या वकिलांना सुद्धा इतर आरोपींसोबत अटक केली आहे.


नेमकं काय घडलं?


शरद मोहोळ दुपारी सुतारदरा येथील घराबाहेर पडले तेव्हा, त्याचे तीन साथीदार बॉडीगार्ड त्याच्यासोबत होते. पण हे साथीदार आपला घात करतील अशी पुसटशी कल्पनाही शरद मोहोळला नव्हती. घराबाहेर पडल्यावर काही अंतर चालल्यानंतर याच त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. आरोपींनी शरद मोहोळवर गोळीबार केला. शरद मोहोळला एक गोळी छातीत, एक गोळी डोक्यात तर दोन गोळ्या मानेला लागल्या. शरद मोहोळ रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडला आणि आरोपींनी तेथून पळ काढला.


कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्येचं सीसीटीव्ही


काहीच महिन्यांपूर्वी शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राजकारण आणि गुन्हेगारी जगताच्या हातमिळवणीचे प्रकार आधीही आपण पाहिलेत. त्यानुसार, स्वाती मोहोळ यांच्या भाजप पक्ष प्रवेशानंतर शरद मोहोळ राजकारणात प्रवेश करणार अशीही चर्चा रंगली होती. मात्र त्याआधीच शरद मोहोळची हत्या करण्यात आली.