आळंदी, पुणे : वारकरी संप्रदायाचं श्रद्धास्थान असणारी इंद्रायणी नदी (Indrayani River) वरील प्रदुषणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे अनेक नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे. यावर आता इंद्रायणी नदीच्या प्रदुषणासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचे आदेश दिले आहे. त्यामुळे आता आळंदीकरांची या इंद्रायणी नदीच्या प्रदुषणापासून मुक्तता होण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस आज आळंदी दौऱ्यावर आहे. फडणवीसांच्या हस्ते वारकरी शिक्षण संस्थेच्या ‘बंकटस्वामी सदन’ या विद्यार्थी वसतीगृहाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
मागील काही महिन्यांत इंद्रायणी नदीच्या प्रदुषणाचा प्रश्न नागरिकांनी सरकार दरबारी अनेकदा मांडला होता. मात्र यावर कोणतीही करवाई होताना दिसली नाही अनेक राजकीय नेत्यांनी यासंदर्भात कारवाईचे आदेश दिले मात्र प्रदुषणाचं प्रमाण वाढतानाच दिसत आहे. संपूर्ण नदी फेसाळलेली दिसते. या नदीच्या प्रदुषणामुळे आळंदीतील हजारो नागरिकांचा जीव धोक्यात असल्याचं अनेकदा नागरिकांनी बोलून दाखवलं आहे.
आषाढी वारी, कार्तिकी एकादशी अशा प्रसंगी लाखो वारकरी आळंदीनगरीत दाखल होतो. तेव्हा याच इंद्रायणी नदीत ते पवित्र स्नान करतात अन् तीर्थ म्हणून हेच रसायनयुक्त पाणी पितात. पण आता वारकरी अन स्थानिकांना या पाण्यामुळं आजार जडत आहेत. गेल्या सात वर्षांपासून अनेकदा अशी परिस्थिती उद्भवलेली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तशा तक्रारी ही करण्यात आल्या आहेत. त्यांनी काही कंपन्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र प्रदुषण कमी होताना दिसत नाही आहे. त्यामुळे आता थेट देवेंद्र फडणवीसांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे प्रदुषण दूर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
500 विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्थेकरीता 5 कोटी रुपयांचा निधी देणार
आळंदीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वारकरी शिक्षण संस्थेच्या ‘बंकटस्वामी सदन’ या विद्यार्थी वसतीगृहाचे लोकार्पण करण्यात आले. वारकरी शिक्षण संस्थेतील सुमारे 500 विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्थेकरीता 5 कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली. वारकरी शिक्षण संस्थेचे कार्य बघून मनाला समाधान होते. मानव समाजाला प्रेरणा देणाऱ्या भागवत धर्माची पताका फडकत ठेवण्याचे काम वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून होत आहे. संस्थेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून भारतीय सांस्कृतिक विचार लाखो लोकांपर्यंत पेाहोचविण्यात येतो. संस्थेच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि आपला विचार जनसामान्यांपर्यंत पेाहोचविण्याचे कार्य केले जाते, असंही ते म्हणाले.
इतर महत्वाची बातमी-