बारामती, पुणे : बारामती लोकसभेवर सध्या राज्याच्या राजकारणाचं चांगलंच लक्ष लागलं आहे. त्यातच एकीकडे अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार (Sunetra pawar) लोकसभेचं मैदान गाजवणार असल्याच्या चर्चा सुरु असताना आणि त्यांचा विकास रथ शहरात फिरत असताना  दुसरीकडे नणंद असलेल्या खासदार सुप्रिया सुळेंनीदेखील (Supriya Sule) बारामती लोकसभेसाठी कंबर कसल्याचं दिसत आहे. नणंद- भावजय दोघीही एकाच दिवशी बारामतीचा दौरा करत आहे आणि विकासकामांचा आढावा आणि पाहणी करत आहे. बारामतीकरांच्या गाठीभेठी घेत असल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला  (Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar) तुतारीवाला माणूस (Tutarivala Manus) हे चिन्ह मिळालं आहे. त्यावरदेखील सुप्रिया सुळे यांनी दौऱ्यादरम्यान प्रतिक्रिया दिली आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नव्या चिन्हाबाबत काय म्हणाल्या?


राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला तुतारीवाला माणूस चिन्ह मिळाल्यावर पहिल्यांदाच सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाच्या संस्थापकाकडून पक्ष काढून घेतला ही देशातील पहिलीच घटना आहे.  हे दुर्दैवी आहे.अदृश्य शक्तीची ही एक खेळी आहे. कारण अदृश्य शक्ती देश चालवत आहे, अशा खड्या शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, आम्ही कोर्टात लढत आहोत आणि लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. आता आम्हाला धमक्या दिल्या तरी आम्ही घाबरणार नाही आम्ही शून्यातून पुन्हा काम सुरू करणार आहोत. 


नव्या चिन्हासह नव्या उमेदीने लढणार!


नवं चिन्ह आता लोकापर्यंत पोहोचवणार आहोत. या चिन्हावर आता आम्ही लोकसभा लढणार आहोत. माध्यमं आमचं चिन्ह लोकापर्यंत पोहचवत आहेतच मात्र आम्हीदेखील आता कामाला लागलो आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 


मनोहर जोशी यांच्या निधनाची बातमी दु:खद


'माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाची बातमी दु:खद आहे. त्यांना मी श्रध्दांजली वाहते. जोशी आणि पवार कुटुंब यांचे पाच दशकाचे ऋणानुबंध आहेत. जोशी साहेबांसोबत मला बाळासाहेबांच्या आणि काकींची आठवण येते. राजकीय मतभेद असले तरी आमचे कौटुंबिक संबंध वेगळे होते. राजकीय मतभेद होते मनभेद नव्हते.आपल्या घरातील कर्ता पुरुष आणि आमचे काका आपल्या सर्वांमधून निघून गेले मी त्यांना मनापासून आदरांजली अर्पण करते', असं म्हणत त्यांनी मनोहर जोशींना आदरांजली वाहिली. 


इतर महत्वाची बातमी-


Sharad Pawar : "एक तुतारी द्या मज आणुनि", शरद पवार गटाला चिन्ह मिळालं; 'तुतारीवाला माणूस' चिन्हावर निवडणुकीचे रणशिंग फुंकणार