(Source: ECI/ABP News/ABP Majha)
डीएसके प्रकरण : बँक ऑफ महाराष्ट्रचे संचालक रवींद्र मराठे यांना पदावरुन हटवलं
डीएसकेंना नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी बॅंक ऑफ महाराष्ट्रचे संचालक रवींद्र मराठे आणि कार्यकारी संचालक आर के गुप्ता यांचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. बॅंक ऑफ महाराष्ट्रचे संचालक मंडळाने हा निर्णय घेतला आहे.
पुणे : डीएसकेंना नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी बॅंक ऑफ महाराष्ट्रचे संचालक रवींद्र मराठे आणि कार्यकारी संचालक आर के गुप्ता यांचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. बॅंक ऑफ महाराष्ट्रचे संचालक मंडळाने हा निर्णय घेतला आहे. रवींद्र मराठे आणि आर के गुप्ता यांना पदावरून हटवण्यात आलं आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रचे सध्याचे कार्यकारी संचालक ए सी रावत यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला आहे. बँकेच्या संचालक मंडळाने नॅशनल स्टॉक एक्सचेंजला ही माहिती कळवली आहे.
डीएसके यांना नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी रवींद्र मराठेंसह काही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. मराठे यांना दोन दिवसांपूर्वी 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला होता. मराठे यांची चौकशी पूर्ण झाली असून आवश्यक ती कागदपत्र ताब्यात घेण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितल्यानंतर न्यायालयाने त्यांचा जामिन मंजूर केला होता.
काय आहे प्रकरण? बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांच्या प्रकरणात बुधवारी मोठी कारवाई करण्यात आली. बँक ऑफ महाराष्ट्रच्या चार अधिकाऱ्यांसह एकूण सहा जणांना अटक करण्यात आली. अधिकाराचा गैरवापर करत नियम डावलून डीएसकेंच्या नसलेल्या कंपन्यांना कर्ज दिल्याचा ठपका या बँक अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. पुणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून ही कारवाई करण्यात आली.
अटक केलेल्यांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे यांचाही समावेश आहे. याशिवाय महाराष्ट्र बँकेचे तत्कालीन क्षेत्रीय व्यवस्थापक एन एस देशपांडे, बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक सुशील मुहनोत, बँकेचे कार्यकारी संचालक आर के गुप्ता, डी एस कुलकर्णी यांच्या कंपन्यांचे मुख्य अभियंता राजीव नेवासकर, डी एस कुलकर्णी यांचे सीए सुनील घाटपांडे यांना आज अटक झाली.