पुणे : प्रसिद्ध लेखक उत्तम बंडू तुपे यांचं हलाखीचं जीवन 'एबीपी माझा'नं सर्वांसमोर आणलं होतं. त्यानंतर त्यांना मातंग समाजातर्फे 1 लाखांची मदत करण्यात आली आहे. एका लाखांचा चेक त्यांना देण्यात आला आहे.
'एबीपी माझा'च्या बातमीनंतर तुपे यांना मदतीसाठी अनेक जण पुढे येत आहेत. अनेक व्यक्ती आणि संस्था तुपेंना मदत करायला पुढे येत आहेत. या मदतीमुळे तुपे यांच्या अडचणी काही प्रमाणात कमी होतील अशी अपेक्षा आहे.
उत्तर तुपे यांना उतारवयात पक्षघात झाल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. त्यांच्या पत्नीलाही पक्षघात झाल्याने त्यांच्या अडचणींमध्ये आणखीनच भर पडली आहे .
साहित्य अकादमीपासून अनेक पुरस्करांचे मानकरी ठरलेल्या उत्तम तुपे यांची राज्य सरकाराने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे सदस्य म्हणून देखील निवड केली आहे. मात्र त्यांच्या हलाखीच्या परिस्थतीकडे मात्र कोणाचं लक्ष नाही.
समाजातील जळजळीत वास्तव, अनुभवांची दाहकता आयुष्यभर लेखणीवाटे साहित्यात उतरवणाऱ्या उत्तम बंडू तुपे यांना उतारवयात मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. घरातील साहित्य कमी आणि त्यांनी लिहलेल्या साहित्यामुळे मिळालेल्या पुरस्कार आणि पदकांची संख्याच जास्त आहे. हे पुरस्कार नीट ठेवायलाही त्यांच्याकडे पुरेशी जागा नाही.
आयुष्यभर सरकारी कार्यालयात शिपाई म्हणून काम करताना तुपेंनी लिहलेलं साहित्य त्यांना मान सन्मान तर भरपूर देऊन गेलं. मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती मात्र काही बदलली नाही . त्यांनी लिहलेल्या पुस्तकांवरील रॉयल्टीही त्यांना प्रकाशकांकडून मिळत नसल्याचं ते सांगतात.
उत्तम तुपे यांची साहित्य संपत्ती
कादंबरी, कथा, नाटक अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारातील तब्बल 52 पुस्तके उत्तम तुपेंच्या नावावर आहेत. झुलवा, भस्म, आंदण, पिंड, माती आणि माणसं, काट्यावरची पोटं, लांबलेल्या सावल्या, शेवंती ही त्यांच्या गाजलेल्या पुस्तकांपैकी काही नावं. झुलवा ही जोगतिणींच्या आयुष्यावरील कांदबरी लिहिण्यासाठी ते स्वतः वेष बदलून जोगतीण बनले आणि जोगतिणींच्या वाट्याला येणारे अनुभव त्यांनी कागदावर उतरवले.
भस्म या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमीचा तर काट्यावरची पोटं या त्यांच्या आत्मचरित्राला राज्य सरकारचा साहित्य सर्वोत्कृष्ट आत्मचरित्रासाठीचा पुरस्कारही मिळाला आहे. पण आज यापैकी एकही पुस्तक त्यांच्याकडे दाखवायला देखील नाही. तिसरीपर्यंत शिकलेल्या तुपेंनी लिहलेली पुस्तके विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवडली गेली. ती आठवून आजही जुने विद्यार्थी त्यांना भेटायला येतात.