पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कार्यक्रमात गोंधळ पाहायला मिळाला. मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी गोंधळ सुरु केला.
'मुख्यमंत्री महोदय, आता तुम्ही तरी आम्हाला वाचवा, आमच्याशी बोला' अशा आशयाचं बॅनर राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने झळकावलं. यावेळी पोलिसांनी बॅनर झळकावणाऱ्या सोमनाथ लोहार या तरुणाला ताब्यात घेतलं. काही दिवसांपूर्वी विद्यापीठातील रेफेक्टरीमध्ये निकृष्ठ दर्जाच्या जेवणावरुन धक्काबुक्की झाली होती. त्यानंतर काही विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे मागे घेण्याची मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर गेल्या काही महिन्यात आंदोलन केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहे. ते मागे घेण्याबाबत अनेकवेळा प्रशासनाशी पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने आज मला हे पाऊल उचलावे लागले. मला किमान पाच मिनिट तरी मुख्यमंत्र्यांशी बोलायचे आहे, असं सोमनाथने सांगितलं.
या कार्यक्रमात लोकप्रतिनिधी, शिक्षक आणि शहरातील विविध महाविद्यालयातील जवळपास 15 हजार सहभागी झाले होते. प्रत्येक विद्यार्थ्याला कडू लिंबाच्या रोपाचं वाटप करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना पर्यावरणाबाबत शपथ देखील दिली.