पुणे : नांदेड पोलिस घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी प्रवीण भटकरला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एसआरपीएफ पोलिस भरती प्रकरणात अडीच कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप प्रवीण भटकरवर आहे.


प्रवीण भटकर हा ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांचा पुतण्या आहे. गेले अनेक महिने तो फरार होता. प्रवीण भटकर हा डॉ. विजय भटकर यांच्या कंपनीत काम करत असतानाच ईटीएच या कंपनीत देखील काम करत होता. या ई टी एच कंपनीकडे एस आर पी एफ भरती प्रक्रियाच्या डेटा एन्ट्रीचे काम सोपविण्यात आलं होतं.

प्रवीण भटकरने कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने पैसे घेऊन उमेदवारांना भरती केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पुणे आणि नांदेडमध्ये गुन्हे नोंद आहेत. आतापर्यंत याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली होती. प्रवीण भटकर हा या प्रकरणी अटक झालेला पाचवा आरोपी आहे. ईटीएच कंपनीचे संचालक शशांक हिवरकर आणि अभिजीत कोळस या़ंचीही याप्रकरणी पोलिसांनी चौकशी केली आहे.

काय आहे नांदेडमधील पोलिस भरती घोटाळा?

नांदेडसह राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये पोलिस भरतीत घोटाळा झाल्याचं मागच्या वर्षी उघडकीस आलं होतं. या प्रकरणी दोघा पोलिसांसह 20 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसात भरती करण्यासाठी उमेदवारांकडून पैसे उकळल्याचं समोर आलं होतं.

पोलिस भरती प्रक्रियेमध्ये उत्तर पत्रिकांच्या तपासणीचं कंत्राट एसएसजी कंपनीकडे होतं. या कंपनीच्या मदतीनेच भरती घोटाळा करण्यात आल्याचं उघड झालं होतं. नांदेडसह अन्य चार जिल्ह्यांतील पोलिस भरतीच्या उत्तरपत्रिका तपासणीचं काम होतं. दोन पोलीस कर्मचारी, एसएसजीचे दोन कर्मचारी यांच्यासह एकूण 20 आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. 20 पैकी 12 आरोपींना नांदेड पोलिसांनी अटकही केली होती.

प्रवीण भटकरला कठोर शिक्षा करा : विजय भटकर

"नांदेडमधील पोलिस भरती घोटाळ्याचा आरोपी प्रवीण भटकरला पकडून त्याला कठोर शिक्षा करा," अशी मागणी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना केली होती. तसंच पोलिस भरती घोटाळ्याशी आणि प्रवीण भटकरशी माझा काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं होतं.

प्रवीण भटकर हा नांदेडच्या पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार असल्याचा आरोप आहे. त्याने ओएमआर नावाची स्वतंत्र कंपनी स्थापन केली. या कंपनीमार्फत तो डाटा जमा करायचा आणि त्याचा वापर भरतीमध्ये घोटाळा करण्यासाठी करायचा, असा त्यांच्यावर आरोप आहे.

धक्कादायक गोष्ट म्हणजे भटकरच्या फसवणुकीचं जाळं संपूर्ण राज्यभरात पसरलेलं आहे.
"प्रवीण भटकर हा शास्त्रज्ञ विजय भटकर यांचा पुतण्या असल्याचा म्हटलं जात होतं. परंतु प्रवीण भटकरशी काहीही संबंध नसून त्याने माझ्या नावाचा उपयोग केला," असं विजय भटकर यांनी सांगितलं.
स्पेशल रिपोर्ट : पोलिस भरतीत घोटाळा, जिल्ह्या-जिल्ह्यातून 'माझा'चा रिपोर्ट