Ashadhi Wari 2022 : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वांनी आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अनोखी मानवंदना दिली. प्रत्यक्ष मंदिराच्या सभामंडपात अश्वांनी प्रवेश करुन गणरायाला वंदन केले. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अश्वांचे पूजन केले. यावेळी अश्वांचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती.
बेळगवच्या अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीच्या या दोन अश्वांचे आज पुण्यात आगमन झाले. यावेळी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दोन्ही अश्वांचे पूजन करण्यात आले. यावेळी दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, अक्षय गोडसे यांसह उर्जीतसिंह शितोळे (सरकार), महादजी राजे शितोळे (सरकार), पंढरपूर देवस्थानचे गहिनीनाथ महाराज औसेकर, राजाभाऊ थोरात, मारुती महाराज कोकाटे, बाळासाहेब वांजळे, योगेश गोंधळे यांसह वारकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माऊलींचे अश्व आणि गणरायाची ही अनोखी भेट आहे. दरवर्षी सुमारे 300 किलोमीटरचा पायी प्रवास करुन हे अश्व वारीला जातात. काही वर्षांपूर्वी या प्रवासात मंदिरा बाहेरुन गणरायाचे दर्शन होत असे. कोरोना संकटापूर्वी सलग दोन वर्षे अश्वांनी गणरायासमोर सभामंडपात जाऊन मानवंदना दिली. यंदा तिसऱ्या वर्षी गणेशाचे दर्शन घेऊन हे अश्व आता आळंदीकडे प्रस्थान करतील. आषाढी वारी ही विठ्ठल भक्तांची वारी आहे. त्यामुळे ज्यांना या वारीला येता येत नाही, ते या अश्वांचे दर्शन घेतात, अशी माहिती शितोळे सरकार यांनी दिली.
वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. यंदा देखील तिसऱ्या वर्षी हे अश्व दगडूशेठ गणपती मंदिराच्या सभामंडपात आले. ट्रस्टच्या 130 व्या वर्षानिमित्त वारीसोहळ्यातील राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची सुरुवात चांगली झाली असून हरित वारी, स्वच्छता, आरोग्य तपासणी आणि वारकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.
महत्वाच्या बातम्या