Puja Khedkar: राज्यासह देशभरात चर्चेत आलेल्या पूजा खेडकरचं (Puja Khedkar) खळबळजनक पत्र समोर आलं आहे. या पत्रातून पुन्हा एकदा पूजा खेडकरने पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंवरती नवे आरोप केले आहेत. पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असताना दिवसेंनी सातत्याने अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप पूजा खेडकरने (Puja Khedkar) केला आहे. दिवसेंनी शासनाला पाठवलेला अहवाल व्हायरल झाल्याने बदनामी झाल्याचे पूजा खेडकरने आपल्या पत्रातून म्हटलं आहे. 


सुहास दिवसेंनी पाठवलेल्या अहवालामुळे मी उद्दाम आधिकारी असल्याची प्रतिमा तयार झाल्याचा आरोप पूजा खेडकरने केला आहे. दिवसे यांनी पुण्यातून खेडकरची (Puja Khedkar) बदली करण्याची केलेली मागणी मान्य न करण्याची विनंती देखील तिने पत्राच्या माध्यमातून केली आहे. ⁠बदली झाल्यास जममानसात मीच दोषी असल्याची प्रतिमा तयार होईल असंही पूजा खेडकरचं (Puja Khedkar)  म्हणणं आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे पूजा खेडकरनी पत्र लिहून दिवसे यांच्या विरोधात तक्रार केली होती. 


पत्रात नेमकं काय लिहलं आहे?


मा. जिल्हाधिकारी पुणे यांनी दिनांक २४/६/२०२४ रोजीच्या पत्राने आपणाकडे माझी तक्रार केल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे माझ्या काही बॅचमेंटनी मला कॉल करून सांगितले. त्यानंतर मीडिया मधूनही मला माझी प्रतिक्रिया विचारण्यात येत होती. परंतु ही प्रशासनाची अंतर्गत बाब असल्याने मी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण यामुळे मी एक उद्दाम अधिकारी असल्याचे माझी प्रतिमा जनमाणसात तयार झाली आहे. याचा मला अतिशय मानसिक त्रास होत असून मी खूपच डिस्टर्ब झाले आहे.


मला माहिती नाही परंतु मी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून पुणे येथे जॉईन झाल्यापासून मला पहिल्या दिवसापासून माननीय जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडून सातत्याने अपमानकारक वागणूक दिली जात होती.


पहिल्याच दिवशी मी रुजू झाल्यानंतर त्यांना जेव्हा भेटण्यास गेले. त्यांना मी सर रुजू होत आहे असे सांगितले. थोडेसे बोलणे झाले. त्यानंतर मी सर कुठे बसू असे विचारल्यानंतर त्यांनी मला परीक्षा विधीन काळामध्ये आयएएस अधिकाऱ्याला स्वातंत्र चेंबर अनुज्ञेय नाही. तुम्ही कुठल्याही अधिकाऱ्याची केबिन शेअर करू शकता असे सांगितले. मी त्यावर काही बोलले नाही. त्यानंतर त्यांनी मला ठीक आहे तुम्ही जॉईन झालाय जाऊ शकता असे सांगून मला त्यांच्या चेंबरच्या बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर मी तिथून बाहेर निघून आले. हे सर्व मला त्या ठिकाणी असणारे अनेक अधिकारी, कर्मचारी यांच्यासमोर सांगण्यात आले.


त्यानंतर मी माझ्या बॅचमेंटला फोन करून विचारले अरे प्रशिक्षण काळामध्ये आमचे जिल्हाधिकारी म्हणतात तुम्हाला बसण्यासाठी स्वतंत्र चेंबर देता येणार नाही. तुमची बसण्याची व्यवस्था काय केली आहे? त्यावर सर्वांनी मला सांगितले आम्हाला बसण्यासाठी स्वतंत्र चेंबर देण्यात आले आहेत. तसेच गाडीची पण व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानंतर मी ही बाब यशदाचे संचालक यांना प्रशिक्षणाचे रिपोर्टिंग करत असताना बोलता बोलता कानावर घातली. त्यावर ते म्हणाले मी जिल्हाधिकारी यांच्याशी बोलतो. त्यानंतर त्यांनी मी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याशी बोललो आहे ते तुझ्या बसण्याची सोय करतील असे सांगितले.


त्यानंतर मी माझी बसण्याची व्यवस्था होईल याची वाट पाहत राहिले. परंतु ती होत नाही म्हणून मी आर डीसी यांच्याशी बोलले. त्यांनी मला बसण्यासाठी दोन जागा दाखवल्या. त्यापैकी एका केबिनला अटॅच टॉयलेट नव्हते त्यामुळे मी ते नको म्हणून सांगितली. दुसरी जागा चौथ्या मजल्यावरील खणी कर्म विभागाच्या स्टोअर मध्ये एक रूम होती ती दाखवली. मी ती पसंत केली. त्या ठिकाणी टेबल खुर्ची ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली. मी त्या ठिकाणी एक दिवस बसले. त्यानंतर मला जिल्हाधिकारी यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी हे घेत असलेल्या सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे सांगितले. मी त्यानुसार त्यांच्याकडे सुनावणीसाठी गेले. सुनावणी झाल्यानंतर दुपारच्या वेळी माझे वडील माझ्या जेवनाचा टिफिन देण्यासाठी आले होते. मी त्यांना म्हटलं या ना तुमची अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याशी ओळख करून देते. म्हणून ते त्यांच्या चेंबरमध्ये आले. त्यांच्यासमोरच मला अतिरिक्त जिल्हाधिकारी मोरे साहेबांनी विचारले झाली का तुझी बसण्याची व्यवस्था? मी त्यांना हो म्हणून सांगितलं. त्यावर त्यांनी मला कोठे बसतेस असे विचारले.


मी त्यांना चौथ्या मजल्यावरील खणी कर्म विभागाच्या स्टोअर मध्ये असलेल्या रूममध्ये बसत आहे असे सांगितले. त्यावर ते म्हणाले तू आएएस ऑफिसर आहेस तू खाली चौथ्या मजल्यावर नको बसू आमच्या मजल्यावरच बस. माझा अँटी चेंबर तुला केबिन म्हणून वापरण्यासाठी देतो. लगेच त्यांनी शिपायाला बोलून मॅडमसाठी या ठिकाणी टेबल लावून घ्या, बाहेर बोर्ड लावा असे सांगितले. त्यानुसार दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी टेबल खुर्च्या लावण्याची व्यवस्था करण्यात आली. तिसऱ्या दिवशी दरवाज्याच्या वरती माझ्या नावाचा बोर्ड लावण्यात आला. मला स्टेशनरी काय काय पाहिजे यासाठी त्या ठिकाणी क्लार्क आले आणि विचारलं. त्यामुळे मी त्यांना मला जे आवश्यक वाटत होते ते मिळाल्यास बरे राहील असे सांगितले.


हे सर्व झाल्यानंतर मी त्या ठिकाणी एक दिवस बसले. दुसऱ्या दिवशी दिनांक २१/६/२०२४ रोजी माझे प्रशिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये असल्याने मी त्या ठिकाणी गेलेली होते. त्या दिवशीच मा. जिल्हाधिकारी जे तीन- चार दिवस कार्यालयामध्ये नव्हते ते कार्यालयात आले. आल्यानंतर माझ्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अँटी चेंबरमध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. असे त्यांना कोणीतरी सांगितले. ते समजल्यानंतर बहुतेक त्यांना या गोष्टीचा राग आला असावा. त्यांनी लगेच संबंधित तहसीलदार ला बोलून माझे टेबल आणि खुर्चा त्या ठिकाणाहून बाहेर काढण्यासाठी सांगितले.


मला हे जेव्हा समजले तेव्हा मी जिल्हाधिकारी सरांशी बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु ते माझे कोणतेही म्हणणं ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. ते मला मी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांचा अँटी चेंबर जबरदस्तीने घेतला असे म्हणाले. मी त्यांना झालेला सर्व प्रकार सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना माझे म्हणणे पटले नाही. मी त्यावर सर माझ्याकडुन काही चूक झाली असल्यास मी त्याची माफी मागते. तरी त्यांचे समाधान झाले नाही. त्यावर मी त्यांना सांगितले की सर मी आयुक्त कार्यालय येथे प्रशिक्षणासाठी आहे. 


उद्या शनिवार रविवार आहे सोमवारी मी येऊन आपणास प्रत्यक्ष घडलेला प्रकार सांगते. त्यानुसार मी सोमवारी माझे एस पी कार्यालयामध्ये प्रशिक्षण असल्याने दुपारच्या वेळेस त्यांना भेटण्यासाठी गेले परंतु ते मीटिंग हॉलमध्ये होते. मला त्यांना भेटता आले नाही. म्हणून मी व्हाट्सअप वर त्यांना एक मेसेज पाठवला. सर मी आपणास भेटण्यासाठी आले होते परंतु आपण मीटिंगमध्ये असल्याने मला भेटता आले नाही. मी एसपी ऑफीसला पुन्हा जात आहे. माझ्या बसण्याच्या जागेबाबत जो काही आपण निर्णय घ्याल तो मला मान्य आहे. यानंतरमला असे वाटले की जे काही झाले आहे ते संपले आहे.


वर नमूद केल्याप्रमाणे मी माननीय जिल्हाधिकारी यांची माझी चूक नसतानाही माफी मागितली. परंतु त्यांनी दिनांक २४/६/ २०२४ रोजी आपणास पत्र लिहून त्यामध्ये माझ्या बसण्याच्या व्यवस्थेबाबत मी कसा ऊद्दामपणा केला याची तक्रार आपणाकडे केली आहे. सर मी वरिष्ठाचा सन्मान ठेवून सांगते की पत्रामध्ये जे काही नमूद करण्यात आलेले आहे ते गैरसमजामधून नमूद केले आहे. विषय फक्त माझ्या बसण्याच्या जागेचा होता परंतु तो एवढा मोठा करून माझी प्रतिमा मलिन करण्यात आली आहे. तसेच मला दोष ठरवून माझी पुणे इथून इतरत्र बदली करण्याची शिफारस करण्यात आली आहे.


सर, माझे जे जिल्हाधिकारी कार्यालयाला प्रशिक्षण होते ते संपलेले आहे. त्यामुळे मला आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बसण्याची सोय करण्याची आवश्यकता नाही. माझे आता विविध विभागातील प्रशिक्षण ऑक्टोबर २०२४ पर्यंत बाहेरच सुरू आहे. त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय गुंतागुंत टाळण्यासाठी माझी बदली करावी असे म्हटले असले तरी आता प्रशासकीय गुंतागुंत होण्याचा विषय राहिलेला नाही. तरीही माझी बदली केल्यास प्रसार माध्यमांमध्ये तसेच जनमानसामध्ये मीच दोषी असल्याची माझी प्रतिमा तयार होईल. याचा विचार करण्यात यावा ही विनंती आहे.