Amol Kolhe: आगामी निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. सर्वच पक्ष आपल्या आपल्या मतदारसंघासह इतर मतदारसंघांचे दौरे करत आहेत. अनेक आमदारांनी देखील या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. अशातच मनसेकडून काही उमेदवारांची घोषणा देखील करण्यात आली आहे. तर आज शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या शिवस्वराज्य यात्रेवेळी जमलेल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षाचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी जुन्नर विधानसभेच्या उमेदवाराची घोषणा केली आहे.
यावेळी बोलताना अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले, "लोकसभा निवडणूक पार पडली आणि आता त्यानंतर जुन्नर विधानसभेचा उमेदवार कोण असणार? तुतारी फुंकणारा तो उमेदवार कोण? असं म्हणत आत्ताच्या आत्ता मी त्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करू का? यावेळी मंचाच्या खाली बसलेल्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) मंचावर असताना अमोल कोल्हे नेमक्या कोणाचं नाव जाहीर करणार अशी उत्सुकता शिगेला पोहचली. मात्र, तितक्यात कोल्हे मागे वळाले, जयंत पाटलांच्या शेजारी जाऊन, मोबाईल घेऊन परत माईक समोर आले. ऐकायचं आहे का ते नाव? मग ऐका, हे नाव आहे, फक्त अन् फक्त शरद पवार साहेब अन त्यांचे विचार, त्यांच्या या बोलण्यानंतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला.
पुढे बोलताना अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले, शरद पवार हे फक्त व्यक्ती नाहीत तर ते विचार आहेत. शरद पवार हे तरूणांचा विचार आहेत, सर्वसामान्यांचा विचार आहेत, शेतकऱ्यांचा विचार आहेत. एक गोष्ट डोक्यात ठेवून आपल्याला पुढं जावं लागेल. नाहीतर दोन बोक्याच्या भांडणात माकडाचा लाभ होतोय असं काही होऊ देऊ नका असंही त्यांनी आज म्हटलं आहे.
जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहिणी खडसे क्रेनमधून पडताना थोडक्यात बचावले
शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्याच दिवशी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला. क्रेनच्या सहाय्याने पुतळ्याला पुष्पहार घालून खाली येत असताना क्रेनची ट्रॉलीमध्ये बिघाड झाला. यामुळे जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहिणी खडसे, मेहबुब शेख थोडक्यात बचावलेत, सुदैवाने यात कोणाला दुखापत झाली नसून सर्व जण थोडक्यात बचावले आहेत. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
पुष्पहार घालून खाली उतरताना अर्ध्यावर पोहचल्यावर क्रेन तुटली. जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहिणी खडसे, मेहबुब शेख खाली पडण्याची शक्यता होती. सुदैवाने, कुणालाही दुखापत झाली नाही पण यात्रेच्या सुरुवातीलाच ही घटना घडल्याने उपस्थितांमध्ये खळबळ उडाली.