Amol Kolhe Shivneri Video : छत्रपतींना कुणी मारू शकत नाही, छत्रपतींचं कुणी हाल करू शकत नाही, कारण छत्रपती हा माणूस नाही तर विचार आहे अशी गर्जना झाली. एका चिमुकल्या पोराने खासदार अमोल कोल्हेंसमोर (Amol Kolhe) छत्रपतींचा विचार सांगितला, तो चिमुकला बोलत असताना अमोल कोल्हे मात्र गुढघ्यावर बसून त्याच्याकडे पाहतच राहिले. नंतर त्या मुलाचं नाव शाहू असल्याचं समजलं आणि पुढे गेलेले अमोल कोल्हे मागे फिरले आणि त्या चिमुकल्याच्या पायाही पडले. हा प्रसंग होता शिवनेरी किल्ल्यावरचा. 


'स्वराज्यरक्षक संभाजी'मधील डॉयलॉग


राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे सध्या लोकसभेच्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत. त्यातून वेळ काढत त्यांनी कार्यकर्त्यांसह शिवनेरी किल्ला गाठला. त्यावेळी एक चिमुकला त्याच्या आईसह किल्ल्यावर आला होता. अमोल कोल्हेंना पाहताच त्या चिमुकला भारून गेला. त्यावेळी त्याने अमोल कोल्हेंच्या 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतील डॉयलॉग म्हणून दाखवला. 


गुडघ्यावर बसून कोल्हे पाहतच राहिले


आपल्या धारदार आवाजात त्या चिमुकल्याने छत्रपतींचा विचार बोलून दाखवला. त्यावेळी त्या चिमुकल्याचा त्वेष अमोल कोल्हे गुडघ्यावर बसून पाहत राहिले. छत्रपतींना कुणीही मारू शकत नाही, कारण तो एक विचार आहे असं त्या मुलाने म्हणताच अमोल कोल्हेंनी त्याला जवळ घेतलं. 


अमोल कोल्हे परत जात होते, त्यावेळी  तो चिमुकला तुमचा फॅन आहे असं त्या मुलाच्या आईने कोल्हेंना सांगितलं. त्यानंतर पुढे गेलेल्या कोल्हेंनी त्या चिमुकल्याचं नाव विचारलं. शाहू असं त्याचं नाव ऐकताच पुढे गेलेले अमोल कोल्हे हे मागे फिरले आणि त्या दोघांनीही एकमेकांच्या पाया पडले. 


दिल्लीसमोर न झुकणारा छत्रपतींचा विचार 


या मुलाचा विचार ऐकल्यानंतर अमोल कोल्हे म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्राला या चिमुकल्याने सांगितलं आहे, छत्रपती हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा विचार आहे आणि तो महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात ठामपणे रुजलाय. छत्रपतींचा हा विचार दिल्लीच्या तख्तासमोर कधीही झुकणार नाही, तो महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा विचार आहे. 


अमोल कोल्हे आणि त्या चिमुकल्याच्या शिवनेरीवरील भेटीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 


ही बातमी वाचा: