पुणे : ऐन पावसाळा आणि कोरोना संकटात पुण्यातील आंबिल ओढा परिसरातील अनधिकृत बांधकामावर पुणे महापालिकेने कारवाई केली. याविरोधात आज नागरिकांना पुणे महापालिकेसमोर ठिय्या मांडला. यावेळी आंदोलकांच्या भेटीसाठी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी "अजित पवार मुर्दाबाद, महाविकास आघाडी सरकार मुर्दाबाद," अशा घोषणा दिल्या. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. 


आंबिल ओढा कारवाईविरोधात आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आलं. 130 घरांवर कारवाई केली जाणार असल्याने नागरिक आक्रमक झाले. यावेळी जवळच असलेल्या आंदोलनाच्या भेटीला आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील भेट दिली. मात्र या वेळेला वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना बघताच मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. "अजित पवार मुर्दाबाद.. महाविकास आघाडी सरकार मुर्दाबाद," अशा घोषणा दिल्या आणि त्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला. 


सुप्रिया सुळे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि यावेळी बाधित महिला तसंच आंदोलकांशी मला बोलू द्या, असं त्यांनी म्हटलं. मात्र त्यानंतर वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी गोंधळ आणखीच वाढवला. अजित पवारांनी ही कारवाई करण्यास सांगितलं. बिल्डर देखील अजित पवार यांच्या जवळचा आहे असं सांगत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि आंदोलकांनी न्याय देण्याची मागणी केली. याशिवाय दलितांची मते चालतात मात्र आमचे प्रश्न का सोडवता येत नाही असा सवालही उपस्थित केला. 


वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि आंदोलकांच्या आरोपांनंतर सुप्रिया सुळे यांना माध्यमांनी प्रश्न विचारले. त्यानंतर सुप्रिया सुळेंनी आव्हन स्वीकारलं. "ही माहिती कुठून मिळाली त्याचा काही पुरावा आहे का? मला सगळे पुरावे द्या, ऑडिओ क्लिप द्या मी स्वतः पोलीस कम्लेंट करेन," अशी ग्वाही दिली.


संबंधित बातम्या