पुणे : पुण्यातील आंबिल-ओढा परिसरातील पुणे महापालिकेने अतिक्रमणाविरोधात कारवाई केली. ऐन पावसाळ्यात आणि कोरोना संसर्गात केलेल्या कारवाईविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या कारवाईविरोधात आक्रमक झालेल्या काही स्थानिक नागरिकांनी आत्मदहनाचाही प्रयत्न केला. शिवाय पोलीस आणि स्थानिकांमध्ये झटापटही झाली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी या ठिकामी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.
आंबिल ओढा परिसरातील हा प्लॉट पुणे महापालिकेच्या मालकीचा असून इथल्या रहिवाशांना केदार बिल्डर्सकडून अतिक्रमणाची नोटीस पाठवल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. ही महापालिकेची जागा असली तरी महापालिकेकडून कोणतीही नोटिस आली नसल्याचं नागरिकांनी सांगितलं. आंबिल ओढा परिसरातील या 100 गुंठ्याच्या प्लॉटवर शहरातील अनेक बिल्डर्संची नजर असल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केली आहे. महापालिकेच्या वतीनं कोणतीही नोटिस आली नसल्याने ही कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप स्थानिक नगरसेवकांनी केला आहे. या परिसरातील लोक गेली पन्नास वर्षे इथं राहत असून त्यांच्या पुनर्वसनाचा कोणताही प्रयत्न न करता महापालिका ही कारवाई केली जात असल्याचाही आरोप केला जात आहे.
हा याआधी आंबिल-ओढा पुण्यासाठी विद्ध्वंसक ठरला आहे. परंतु आंबिल-ओढ्याच्या परिसरात ही कारवाई नेमकी का झाली? हे जाणून घेऊया
पुण्यातील कात्रजच्या टेकडीवरुन पावसाचं पाणी आंबिल ओढ्याच्या मार्फत पुण्यात येतं आणि दांडेकर पुलालगत हा ओढा मुठा नदीला मिळतो. सध्याच्या पुण्यातील कात्रज, धनकवडी, बालाजी नगर, पद्मावती, सहकार नगर, दत्तवाडी हे परिसर या आंबिल ओढ्याच्या दोन्ही बाजूंना वसले आहेत. तीन वर्षांपूर्वी कात्रजच्या टेकडीवर ढगफुटी होऊन आंबिल ओढ्याला मोठा पूर आला आणि या सगळ्या परिसरात दाणादाण उडाली. अनेकांचे संसार रस्त्यावर आले तर 30 हून अधिक जण मृत्युमुखी पडले. त्यानंतर आंबिल ओढ्याच्या नैसर्गिक प्रवाहावर गेल्या अनेक वर्षांपासून झालेली अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात झाली. आजची कारवाई हा त्याचाच एक भाग आहे.
पण हा आंबिल ओढा याच्या आधीही पुण्यासाठी विद्ध्वंसक ठरला आहे. आंबिल ओढ्याच्या प्रवाहाला आवर घालण्यासाठी सर्वात आधी प्रयत्न केला तो राजमाता जिजाबाई यांनी. पुण्याचा कारभार पाहताना राजमाता जिजाबाईंनी आंबिल ओढ्यावर पर्वतीच्या पायथ्याला एक छोटं धरण बांधलं जे बेल धरण म्हणून ओळखलं गेलं. आजही या धरणाचे अवशेष पाहायला मिळतात. त्यानंतर नानासाहेब पेशव्यांनी 1749 साली पुण्याला पाणी पुरवठा करण्यासाठी कात्रजला दोन तलाव बांधले आणि पाणी पुरवठ्याची स्वतंत्र यंत्रणा उभारुन पुण्यातील पेठांमध्ये आणि शनिवार वाड्यात पाणी आणलं. या पाणीपुरवठ्याच्या बोगद्यात अतिरिक्त होणारं पाणी आंबिल ओढ्यात सोडण्याची सोय करण्यात आली. मात्र तरीही आंबिल ओढ्याला पूर येऊन जीवितहानी होणं अधूनमधून सुरुच राहिलं. नानासाहेब पेशवे पुण्याचा कारभार पहात असताना अचानक या ओढ्याला पूर येऊन 400 लोक वाहून गेल्याची नोंद आहे.
त्यानंतर आंबिल ओढ्याला आवर घालण्याचा आणखी एक प्रयत्न करण्यात आला आणि आताच्या सारसबागेजवळ एक तलाव बांधण्यात आला. त्या तलावाचा काही भाग बुजवून त्यावर आजची सारसबाग आणि गणपती मंदिर उभारण्यात आलं. आजही सारसबागेतील गणपती या तळ्याच्या मधोमध आहे.
संबंधित बातम्या