पिंपरी - चिंचवड :  आषाढी वारीच्या (Ashadhi Wari 2024)  तोंडावर इंद्रायणी नदी (Indrayani River)  फेसाळली आहे. वारकऱ्यांच्या जीवाशी सातत्याने खेळलं जातंय. हा खेळ पिंपरी पालिका ते लोणावळा दरम्यानच्या नगरपरिषद आणि ग्रामपंचायतींनी मांडल्याचा निष्कर्ष आता समोर आलाय. त्याचअनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (Maharashtra Pollution Control Board)  या सर्व शासकीय कार्यालयांना नोटिसा धाडत, त्यांनाच या प्रकरणी जबाबदार धरलेलं आहे. या शासकीय कार्यालयांनी त्यांचे एसटीपी प्लांट अद्यावत केले नसल्यानं आणि त्यातून दुषीत पाणी नदीत सोडल्यानं इंद्रायणी अशी जीवघेणी झाल्याचं प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सर्व्हेक्षणात समोर आलंय. 


 पिंपरी चिंचवड हद्दीतील काही कंपन्या नदीत रसायनयुक्त पाणी सोडत असल्याची ओरड होती. मात्र आता अशी एकही कंपनी नदीत रसायनयुक्त पाणी सोडत नसल्याचा दावा प्रदूषण मंडळाने केलाय. हा दावा करतानाच पिंपरी पालिका ते लोणावळा दरम्यानच्या नगरपरिषद आणि ग्रामपंचायतींना यात दोषी ठरवलेलं आहे. मात्र केवळ नोटीसा धाडून इंद्रायणी नदी मोकळा श्वास घेणार का? याचं उत्तर प्रदूषण मंडळाकडे नाही. त्यामुळं प्रदूषण मंडळाने केवळ नोटीसी धाडण्यात धन्यता न मानता या शासकीय कार्यालयांवर ठोस कारवाई करणे गरजेचे आहे. तेंव्हाच वारकऱ्यांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ थांबेल.


नदीच्या प्रदूषणात सातत्याने वाढ


मागील अनेक वर्षांपासून नदीच्या प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. अनेक वर्षांपासून वारकरी आणि गावकऱ्यांनी यासंदर्भात प्रशासनानाला निवेदनं दिली आहेत. मात्र त्यावर कोणीही तोडगा काढला निघाला नाही आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा काही तासांवर येऊन ठेपलेला असताना, आजही इंद्रायणी नदी फेसाळलेली आहे. यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण झालाय. वारकरी इंद्रायणी नदीच्या पाण्यात स्नान करतात. पाणी तीर्थ म्हणून पितात. या नदीचं पाणी प्रत्येक वारकऱ्यांसाठी तीर्थ आहे, त्यामुळे या नदीकडे शासनाने लक्ष देणं गरजेचं असल्याचंही नागरिकांनी सांगितलं आहे. 


नदीकाठची शेती आणि जनावरे धोक्यात


या नदीकाठी अनेक गावं आहेत आणि शेतीदेखील आहे. या प्रदुषित पाण्यामुळे शेतीचं आरेग्य धोक्यात आले आहे. शिवाय शेतीसाठी लागणारे जनावरंदेखील याच नदीतील पाणी पित असल्याने जनावरांच्या आरोग्यालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नदी प्रदुषीत करणाऱ्यांवर नागरिक संतापले आहेत. या नदीत प्रक्रिया न करता पाणी सोडले जाते, त्यामुळे या रसायन युक्त पाणी सोडणाऱ्यां कंपन्यांवर कारवाई करा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 


हे ही वाचा :


माऊलींचे प्रस्थान तोंडावर, तरी इंद्रायणी फेसाळलेलीचं; संतापलेल्या वारकऱ्यांचा राजकीय नेत्यांना आळंदीत पाय न ठेऊ देण्याचा इशारा