Pune Drugs Case : पुण्यातील L3 बार ड्रग्स पार्टी प्रकरण उघडकीस आलं असताना आता मॉलमधील ड्रग्स सेवन करतानाचा नवीन व्हिडओ समोर आला. काही महिन्यांपूर्वी ललित पाटील प्रकरण चर्चेत असताना आता अमली पदार्थाचे नवीन प्रकरण समोर आल्यानंतर पुण्यात नेमकं काय सुरू आहे, याची चर्चा सुरू झाली आहे. आता, 'पिट्या भाई' अर्थात अभिनेता रमेश परदेशीची (Ramesh Pardeshi) पोस्ट आता चर्चेत आली आहे


'मुळशी पॅटर्न' या चित्रपटात रमेश परदेशीने पिट्या भाईची भूमिका साकारली होती. रमेश परदेशीने काही महिन्यांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल करत पुण्यातील तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याचा आरोप केला होता. आता, पुण्यात पोर्शे कार प्रकरण आणि त्यानंतर आता सुरू असलेल्या अमली पदार्थ सेवनाच्या मुद्यावरून रमेश परदेशीची पोस्ट चर्चेत आली आहे. रमेश परदेशीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, व्यसन,ड्रग्स आधी शहराच्या वेशीवर होते मग टेकड्या आणि आता मध्यवस्तीत आलय. घरापर्यंत किंवा घरात यायची वाट पाहणार का? आपण पुणेकर म्हणुन काही करणार की नाही. मी तर करणार तुम्ही?  असा प्रश्न पिट्याभाईने पुणेकरांना विचारला आहे. 



पिट्याभाईकडून व्हिडीओ पोस्ट


रमेश परदेशीने आणखी एक पोस्ट केली आहे. रमेश परदेशीने मॉलच्या बाथरुममध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज सेवनाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आपल्या पोस्टमध्ये त्याने म्हटले की, आधी ललित पाटील,आज फर्ग्युसन रस्त्यावर ड्रग्स पार्टी आणि त्याच दिवशी एका मॉलच्या बाथरूम मध्ये ह्या तरुणींचे ड्रग्स सेवन. हेच अशा प्रकारच वास्तव मी काही महिन्यापूर्वी दाखवलं (अपवाद चेहरे ब्लर करायचा) त्यांनी तर जे काही व्यसन केल ते तर सार्वजनिक जागेत ते पण सर्वासमोर आणि ते करताना त्यांना काही फरक पडला नाही. आणि आता ह्या बाथरूम मध्ये हे करतायत बिनधास्त आणि त्यांच सार्वजनिक आयुष्य कस धोक्यात आणले ही तक्रार करून माझे माझ्या कुटुंबाचे मानसिक स्वास्थ्य घालावले  असे रमेश परदेशीने म्हटले. 


 



आपल्या पोस्टमध्ये त्याने पुढे म्हटले की, आपले आपल्या शहराकडे, आपल्या आणि आजुबाजूला असणार्‍या मुलांमुलीकडे लक्ष आहे का?  आपण लक्ष देणार आहोत का? की फक्त प्रशासन आणि  पोलीस यंत्रणा यावर अवलंबून न राहता एक पालक नागरिक म्हणून पुढची पिढी बरबाद होऊ नये म्हणून काही करणार आहोत का? असा सवाल करताना  आणि करणार असाल तर डोळे,कान उघडे करून फिरा असे आवाहनही त्याने केले. सगळे जण मिळून  छत्रपती शिवाजी महाराज यांनी सोन्याच्या नांगरान नांगरलेल्या पावित्र पुण्यभूमीला जपू अशी सादही रमेशने आपल्या पोस्टमध्ये घातली आहे. 


पुण्यात कायद्याचं राज्य राहिलंय का? विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्याला आता ड्रग्जमाफियांनी ताब्यात घेतलंय का? पुण्याला ड्रग्जच्या नशेबाजांचा विळखा पडलाय का? आणि पुण्यात कायदा-सुव्यवस्था नावाची गोष्ट औषधाला तरी उरलीय का? असे संतप्त सवाल आता पुणेकर विचारू लागले आहेत.