Khedshivapur :  धर्म, धर्माच्या नावाखाली सुरु असलेल्या दंगली आणि राडे आपण अनेकदा पाहिली आहेत. त्यामुळे दोन धर्मांमध्ये द्वेष निर्माण झाल्याचंही आपण पाहिलं आहे. मात्र हिंदू आणि मुस्लिम सलोखा जपणारं एक गाव पुणे जिल्ह्यात आहे. खेडशिवापूर असं या गावाचं नाव आहे. या गावात मंदिर आणि मशीद शेजारी शेजारी आहे. भजन आणि अजान एकत्र होतं. त्यामुळे जाती धर्माच्या भिंती ओलांडून या गावातील गावकरी सलोख्याने राहताना दिसतात. 


पुण्यापासून 25 किलोमीटर अंतरावर हे खेडशिवापूर गाव आहे. या गावातील नागरिकांनी धर्माच्या पलीकडे जाऊन माणूसकी जपण्याचा संदेश दिला आहे. गावात एका लहान गल्लीच्या ( बोळ) अंतराने मंदिर आणि मशीद आहे. हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माचे लोक या गावात गुण्यागोविंदाने नांदतात. गावात जितक्या भक्तीभावाने अजान केलं जातं तितक्याच जल्लोषात भजनात अनेक नागरिक तल्लिन होताना दिसतात. गावातील उरुस म्हणजेच जत्रा मोठ्या जल्लोषात होते. ग्रामदैवतेची ही जत्रा असते. या जत्रेत हिंदू आणि मुस्लिम दोघेही एकत्र येत जत्रेची तयारी करतात आणि मोठ्या श्रद्धेने एकमेकांच्या धर्माचा आणि सणांचा आदर करताना दिसतात.


लहाण्यांनाही तिच शिकवण...


या खेडशिवापूर गावातील तरुण आणि लहान मुलांनीदेखील गावकऱ्यांचा आदर्श घेतला. गावातील बाकी लोक ज्या प्रमाणे प्रत्येकांच्या धर्मांचा आणि त्यांच्या रुढी परंपरांचा आदर करतात. तीच शिकवण या गावातील लहान मुलांना आणि तरुण पीढीला दिली जाते. त्यांनाही अजान आणि भजनात सहभागी करुन घेतलं जातं. त्यांनाही जाती-धर्माच्या सगळ्या चौकटी मोडून सामाजिक बांधिलकी जपण्याची आणि सलोखा बाळगण्याची शिकवण देतात. त्यामुळे गावातील सगळे लहान मुलं आणि तरुणही एकत्र सगळे सण साजरे करतात. 


अक्षय्य तृतीया अन् ईद एकत्र साजरी



अक्षय्य तृतीया हा हिंदूंचा महत्वाचा सण आहे तर ईद हा मुस्लिम बांधवांचा महत्वाचा सण आहे. या गावात हे दोन्ही सण एकत्रित साजरे केले जात आहे. सणांमध्येच नाही तर एकमेकांच्या दु:खात देखील ते सहभागी होताना दिसतात. या गावात हिंदूंच्या घरात दर्जांच्या नैवेद्यासाठी मलिदा बनवला जातो तर मुस्लिम बांधवांच्या घरात पुरणपोळी बनवली जाते. सामाजिक सलोखा जपणारे भारतात अनेक गाव आहेत.त्याच गावांपैकी खेडशिवापूर हे एक गाव आहे.