पुणे: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. अशातच अनेक पक्षांचे नेते सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेत असल्याचं चित्र आहे, ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या हालचाली दिसून येत आहेत. अशातच आज पुण्यात शरद पवारांच्या (Sharad Pawar) भेटीसाठी अनके नेत्यांनी हजेरी लावली, यावेळी अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) शरद पवारांच्या (Sharad Pawar) भेटीला आल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आहेत. 


उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्ष सोडू नये, यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केले मात्र, उमेश पाटील आपल्या राजीनाम्यावर ठाम आहेत. महाविकास आघाडीतील पक्षाकडून त्यांना पक्षप्रवेशाचे निमंत्रण मिळाले असून ते शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीत जाणार की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हाती घेणार, याची मोहोळच्या राजकारणात चर्चा रंगली आहे. मात्र, आज ते शरद पवारांच्या भेटीला आले आहेत, यामुळे ते पुन्हा शरद पवारांसोबत (Sharad Pawar) येणार असल्याच्या देखील चर्चा रंगल्या आहेत. 


यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, मोहोळची चर्चा आधीपासून आहे, मी जेव्हापासून सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात आहे, तेव्हापासून माझा तेथील हुकूमशाहीला आणि दडपशाहीला माझा विरोध आहे. तो विरोध पक्ष एकत्र असताना आणि शरद पवारांसोबत काम करत असताना पासूनचा आहे. तो नवीन नाही. त्या ठिकाणी असलेली परिस्थितीबाबत बोलण्यासाठी मी आज शरद पवारांच्या भेटीसाठी आलो आहे, असंही त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणालेत. 


विलास लांडे,अतुल बेनके देखील शरद पवारांच्या भेटीला


पुण्यात शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीला अनेक नेते आज दाखल होत आहेत. यावेळी पिंपरी चिंचवड माजी आमदार विलास लांडे पुन्हा शरद पवारांच्या भेटीला आल्याचे दिसून आले, गेल्या काही दिवसांपासून ते सातत्याने शरद पवारांची भेट घेत आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी अजित पवारांकडून त्यांना उमेदवारी मिळावी अशी त्यांची इच्छा होती, त्यावेळी तिकीट न मिळाल्याने त्यांच्या नाराजीच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. विलास लांडे यांच्यासोबतच भाजप नेते पृथ्वीराज जाचक शरद पवारांच्या भेटीला आले आहेत. पुण्यातील मोदी बागेतील कार्यालयात या भेटी सुरू आहेत. त्याचबरोबर आमदार अतुल बेनके यांचे भाऊ डॉ अमोल बेनके देखील शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत. 


विलास लांडेंची भेटीवर प्रतिक्रिया


विलास लांडे यावेळी भेटीबाबत बोलताना म्हणाले, लपून छपून मी कधी भेटलो नाही. शरद पवारासोबत आम्ही कायम आहे, साहेब आमचे दैवत आहे, ते सर्वसामन्याचा नेता आहेत. शिरूर, पिंपरीमधील उमेदवाराबाबत चर्चा करण्यासाठी आलो आहे. आम्हाला अनेक जागा मिळतील. मी साहेबांसोबत आहे, लोकसभा निवडणुकीपासून सोबत आहे. अजित दादांनी लोकसभेला दिलेला उमेदवार पटलेला नव्हता. 18-19 तारखेला जागा वाटप शरद पवार जाहीर करणार आहेत. भोसरी, खेड, मावळ, पुणे या ठिकाणी प्रचार करणार आहे. अजित दादाशी वैयक्तिक संबंध आहेत, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.