पुणे: आज अनंत चतुर्दशी दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह दगडूशेठ हलवाई गणपतीची पुजा केली, त्यानंतर पुण्यातील अखिल मंडई मंडळ या ठिकाणी अजित पवार गणपती बाप्पांची आरती केली त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना अजित पवारांनी (Ajit Pawar) शांततेत आणि उत्साहात बाप्पाला निरोप द्यावा आणि नागरिकांनी, गणपती मंडळांनी आपापली जबाबदारी पार पा़डत शांततेच्या मार्गाने सहभागी व्हावं, असं आवाहन केलं, यावेळी पत्रकारांनी त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत प्रश्न विचारताच त्यांनी उत्तर दिलं. 


निवडणुका तोंडावर आल्या आहेत, सरकारने अनेक योजना राज्यातील नागरिकांसाठी आणल्या आहेत, आता येत्या काळात तुम्ही मुख्यमंत्री व्हावं असं अनेकांना वाटतं, त्यावर बोलताना अजित पवार  (Ajit Pawar)म्हणाले, सर्वांनाच आपापले नेते मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं असतं. त्यावर दादांना वाटतं का? या प्रश्नावर बोलताना अजित पवार  (Ajit Pawar) म्हणाले, सर्वांना वाटतं म्हणजे त्यात दादा पण आले, त्यांच्या उत्तरावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 


आपला मुख्यमंत्री व्हावा असं सर्व राजकीय पक्षांना वाटतं असतं, प्रत्येकाचं वेगवेगळ्या प्रकारचं मत असतं, पण सर्वांचीच इच्छा पुर्ण होते, अशातला भाग नाही. जागा एकच असते, त्याला तुम्हाला १४५चा आकडा पाहिजे, तर दुसरी गोष्टी मतदार राजाच्या हातात, कोणाला निवडणून द्यायचं. हे असल्यामुळं लोकशाही, संविधान, डॉ.बाबासाहेबांनी दिलेला मतदानाचा अधिकार, या बाबी महत्त्वाच्या आहेत. शेवटी सर्वांच्या बाबतीत चांगलं व्हावं, ही सर्वांचीच इच्छा असते. त्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतात, असंही पुढे अजित पवारांनी म्हटलं आहे. 


संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया 


शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “जो राहुल गांधींची जीभ छाटेल त्याला 11 लाखांचे बक्षीस देणार”, असं वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन प्रचंड राजकारण तापलं आहे, याबाबतच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, आज हा असं बोलला तो तसा बोलला त्यावरती चर्चा करायला नको. माझ्यासहित कुणीही वेडी वाकडी विधान करू नये. समाजात अंतर पडेल असे बोलू नये
वातावरण घडूळ होतं, सुसंस्कृत महाराष्ट्राची पंरपरा आहे, जातीजातीत तणाव निर्माण होईल, त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतील, असं कोणीही करू नये, त्याला माझा विरोध असेल असंही त्यांनी म्हटलं आहे. 


अजित पवारांच्या पक्षाला महायुतीत ८०-९० जागांची अपेक्षा


राष्ट्रवादी अजित पवार  (Ajit Pawar) गटाचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी मी जागावाटपाच्या प्रक्रियेत नसलो, तरी ८०-९० जागांची मागणी केली असल्याचे कानावर आले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये जागावाटपावरून पर्याय वादाची ठिणगी पडण्याची शक्यता समोर आली आहे. राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू झाल्याचं चित्र आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा मिळविण्यासाठी झटावे लागत असल्याचे चित्र आहे. 


याच अनुषंगाने भुजबळांनी माध्यमांना जागावाटपाबाबत आमचे नेते अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे निर्णय घेत आहेत. त्यांच्यात काय चर्चा झाल्या किंवा होत आहेत, यांची माहिती मला नाही. मात्र, माझ्या कानावर आल्यानुसार आम्ही ८०-९० जागा मागितल्या आहेत. त्याचा काय निकाल लागतो, हे मात्र गुलदस्तात असल्याचे भुजबळांनी सांगितले.