पुणे: राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपूर्वी अजित पवार (Ajit pawar) आणि शरद पवारांची (Sharad Pawar NCP) राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. याबाबत दोन्ही पक्षांकडून स्पष्टपणे उत्तर देखील देण्यात आलं होतं, मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत केलेल्या वक्तव्याने नेत्यांच्या भुवया उंचावल्या. पांडुरंगाची ईच्छा असली तर बहीण-भाऊ आषाढी एकादशीपर्यंतही एकत्र येऊ शकतात, असा गौप्यस्फोट मिटकरी यांनी केला आहे. 10 तारखेला पक्षाच्या मेळाव्यापर्यंत वाट बघा, मेळाव्यात मोठे संकेत मिळण्याचे सुतोवाच मिटकरींनी केले होते. मात्र, मिटकरींच्या या वक्तव्याने पक्षातील बड्या नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यावर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे संतापल्याचं पहायला मिळालं.
मिटकरींच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया देताना, सुनील तटकरे म्हणाले, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून काल यासंदर्भात स्पष्टपणाची भूमिका मांडली आहे. एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय हा सामुदायिकरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच प्रमुख नेत्यांना घेऊन आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखाली घेतला. यावेळी सुनील तटकरे यांनी वरिष्ठ नेत्यांची नावे घेऊन वेगळी राष्ट्रवादी तयार करण्याची भूमिका देखील सांगितली. राज्यातल्या जनतेने आता आमचा राष्ट्रवादीवर शिक्कामोर्तब केला आहे. राज्यात आम्ही आता एनडीएच्या सरकारमध्ये सहभागी आहोत. वेगळी राष्ट्रवादी करण्याचा निर्णय आता अधोरेखित आहे, त्यामुळे त्याच्यात जराही बदल होणार नाही. आम्ही घेतलेल्या भूमिकेत ज्यांना यायचे त्यांनी यावं. त्यामुळे एकत्र येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असंही सुनील तटकरे यावेळी म्हणाले आहेत. तर अमोल मिटकरी यांनी आता बोलताना जपून वक्तव्य करावं, असं म्हणत सुनील तटकरे अमोल मिटकरींवर संतापले. तर पक्षातील एखाद्या वरिष्ठांनी एकदा भूमिका मांडली की कोणी त्याच्यावर बोलण्याची गरज नाही असंही त्यांनी पुढे स्पष्टपणे सांगितलं आहे.
सुनील तटकरेंनी आधीच स्पष्ट केलेली भूमिका
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा होत असतानाच राष्ट्रवादीच्या या दोन्ही बाजुंचा वर्धापनदिन 10 तारखेला पुण्यातच आयोजित करण्यात आला आहे. अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा वर्धापन दिन पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी क्रिडा संकुलात होणार आहे. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या ठिकाणाची पाहणी केली. त्यावेळी खासदार सुनील तटकरे दोन्ही बाजुच्या एकत्रीकरणाबाबत देखील भाष्य केलं होतं, गुरूवारी पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सुनील तटकरे म्हणाले, पुण्यात वर्धापन दिन आयोजित करायचं आमचं आधीच ठरलं होतं. आमच्या मागे शरद पवारांचा पक्ष आला असं मी म्हणणार नाही. पवार साहेब जेष्ठ नेते आहेत. दोन्ही बाजु एकत्र येण्याचा कोणता प्रस्ताव नाही, त्यामुळे त्याबद्दल कोणती चर्चाही नाही. आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबरच राहणार आहोत. आमच्यासोबत यायचं असेल तर भाजपसोबत आघाडी करावी लागेल अशी अट घालणारे आम्ही कोण आहोत. 2014, 2016 मध्ये अनेकदा भाजपसोबत जाण्यासाठी चर्चा झाल्या. पण निर्णय झाला नाही. अजित पवारांच्या नेतृत्वात आम्ही सामुहिक निर्णय घेतला. शरद पवार अध्यक्ष असलेल्या पक्षातील निर्णय प्रक्रिया आणि अजित पवार अध्यक्ष असलेल्या पक्षातील निर्णय प्रक्रिया यात काय फरक आहे याबद्दल मी बोलणार नाही. अजित पवार आणि शरद पवार कामाच्या निमित्ताने एकत्र येतायत, त्याचा वेगळा अर्थ काढू नये. त्याचबरोबर अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्यास माझा विरोध आहे ही अफवा आहे, अशी भूमिका सुनील तटकरेंनी याआधीच व्यक्त केली होती.