पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी (Baramati Loksabha) अजित पवार (Ajit Pawar) यांनी वातावरण निर्मिती केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी दंड थोपटल्याने बारामतीमध्ये महायुतीमधील वातावरण बिघडलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगूनही विजय शिवतारे यांनी बारामतीसाठी शड्डू ठोकल्याने बारामतीमध्ये महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. 


आम्ही सुद्धा आरेला कारे करू शकतो, पण.. 


या सर्व पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी (Ajit Pawar on Vijay Shivtare) शिवतारेंच्या आक्रमक पवित्र्यावर प्रतिक्रिया दिली. आम्ही सुद्धा आरेला कारे करू शकतो. मात्र, वातावरण आम्हाला खराब करायचं नसल्याचे अजित पवार म्हणाले. साथ देतील त्यांना सोबत घेऊ, असेही यावेळी अजित पवार यांनी नमूद केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मी आणि देवेंद्र फडणवीसांह बैठक घेणार असून बैठकीमध्ये बसून मार्ग काढू असेही त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान अजित पवार यांनी आज विधानसभा विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठका घेतल्याचे सांगितले. 



वरिष्ठांचे ऐकायचे की नाही? हा ज्याचा त्याचा प्रश्न


दरम्यान, विजय शिवतरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर अधिक भाष्य न करता अजित पवार म्हणाले की, शिवतारे यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी समजावलं आहे. त्यामुळे वरिष्ठांचे ऐकायचे की नाही? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येकाला उत्तर देण्यासाठी मी कोणत्याही प्रकारे बांधिल नाही. एक-दोन दिवसात शिंदेंसोबत बैठक होणार असून महायुतीमधील वातावरण खराब होईल असं काही बोलू इच्छित नसल्याचे अजित पवार म्हणाले. 


20 टक्क्यांसाठी आम्हाला आणखी एकदा बसावं लागेल


दरम्यान जागावाटपावर बोलताना सुद्धा अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, महायुतीमधील 80 टक्के जागांचा निर्णय झाला असून 20 टक्क्यांसाठी आम्हाला आणखी एकदा बसावं लागेल. बारामतीच्या निवडणुकीवरून कोण कुठे उभं राहणार हा संविधानाने दिलेला हक्क असल्याचे अजित पवार म्हणाले. 


शिवाजीराव आढळराव पाटलांच्या पक्षप्रवेशावर काय म्हणाले? 


शिंदे गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील शिरूरमधून राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढणार असल्याची चर्चा आहे. त्यांचा पक्षप्रवेशही लवकरच होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, अजित पवार यांनी पक्षप्रवेशावर कोणतंही भाष्य केलं नाही. मला तुमच्याकडून माहिती समजत असल्याचे ते म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या