पुणे: बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्याविरुद्ध शड्डू ठोकणारे शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणुकीतून माघार घेणार नाही, असे ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे आता बारामती लोकसभेत (Baramati Loksabha) महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्या कडव्या विरोधाचा सामना करावा लागणार, हे जवळपास निश्चित आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांना आपल्याला युतीधर्म पाळावा लागेल, असे सांगितले होते. परंतु, विजय शिवतारे कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायला तयार नाहीत. बारामतीत पवारांविरुद्ध लढणे, ही नियतीने मला दिलेली असाईनमेंट आहे, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) गटानेही शिवतारे यांना इंगा दाखवण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघात  शिंदे गटाची कोंडी करण्याचे ठरवले आहे.


बारामती लोकसभेत बंडखोरीच्या पवित्र्यात असलेल्या विजय शिवतारे यांना शांत करा. अन्यथा आम्ही मावळ लोकसभेत शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. मात्र, विजय शिवतारे यांनी माघार घेतली नाही तर तुम्ही ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांचा प्रचार कराल का, असा प्रश्न या कार्यकर्त्यांना विचारण्यात आला. मात्र, त्यावर फार बोलण्यास अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांनी नकार दिला. परंतु, विजय शिवतारे यांनी बारामतीमधून उमेदवारी मागे न घेतल्यास लोकसभा निवडणुकीत मावळमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संजोग वाघेरे यांचा प्रचार करणार का, हे आता पाहावे लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे श्रीरंग बारणे यांची कोंडी झाली आहे. 


'शिवतारेंना मावळमधून मुंबईत जाऊ देणार नाही'


पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांच्याविरोधात आता मावळ तालुका अजित पवार गट आक्रमक झाला आहे. विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माफी मागावी, अशी मागणी आता मावळ तालुका अजित पवार गटाने केली आहे. शिवतारे यांचा मुंबईला जाणारा रस्ता हा मावळमधून जातो. वरिष्ठ पातळीवर जर शिवतारे यांना समज दिली गेली नाही तर मावळ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मावळ लोकसभेच्या उमेदवाराचे काम केले जाणार नाही. तर बारामती लोकसभेमध्ये जाऊन सुनेत्रा पवार यांचे काम केले जाईल, असा इशारा देखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिला.


आणखी वाचा


विजय शिवतारे बारामतीतून लढण्यावर ठाम! थेट आकडेवारी सांगत मांडलं विजयाचं गणित; अजित पवारांची डोकेदुखी वाढणार!