पुणे: पुण्यातील अजित पवारांचे विश्वासू बाबुराव चांदेरे यांना पिंपरी - चिंचवड पोलिसांकडून वाचवण्याचे प्रयत्न होतायत का असा प्रश्न विचारला जातोय . कारण बाबुराव चांदेरे (Baburao Chandere) यांनी एका बांधकाम व्यवसायिकाला उचलून आपटल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत असताना देखील पोलिसांनी चांदेरेंवर ढकलून दिल्याचा आणि मारहाण केल्याचा गुन्हा नोंद केलाय . मात्र,  या गुन्ह्यासाठी सात वर्षांपेक्षा कमी  शिक्षेची तरतूद असल्यानं चांदेरेंना अटक करणं आम्हाला बंधनकारक नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतलीय . बाबुराव चांदेरे हे पुणे महापालिकेचे (Pune Mahanagarpalika) पाच वेळा नगरसेवक राहिले असून स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलंय . याच संबंधांचा वापर करून चांदेरे यांनी  महापालिकेच्या विविध विकास कामांची तब्ब्ल पन्नास कोटी रुपयांची टेंडर्स त्यांच्या मर्जीतील ठेकेदारांना मिळवून दिलीयत . मात्र त्यातील एका ठेकेदाराच्या कामाला बांधकाम व्यवसायिक विजय रौंदळ यांनी आक्षेप घेतल्यानं चांदेरे यांनी त्यांना उचलून आपटलं . 


आपल्या मर्जीतील ठेकेदाराच्या कामाला हरकत घेणाऱ्या बांधकाम व्यवसायिक विजय रौंदळ यांच्या अंगावर बाबुराव चांदेरे धावून गेले. उजव्या हाताने चांदेरेंनी रौंदळ यांना खाली खेचलं आणि सर्व ताकदीने उचलून डोक्यावर आपटलं. त्यानंतर त्यांना मारहाण देखील करण्यात आली . हात , पाय आणि डोक्याला दुखापत झालेल्या रौंदळ यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत .  मात्र पिंपरी - चिंचवड पोलिसांनी चांदेरे यांच्यावर कलम 324 अंतर्गत ढकलून दिल्याचा आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केलाय . मात्र कलम ३२४ अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्यात चांदेरेंना अटक करण्याची गरज नाही , आम्ही त्यांना चौकशीला बोलावू असं पिंपरी - चिंचवड पोलिसांनी म्हटलंय . 


शनिवारी झालेल्या मारहाणीच्या या घटनेनंतर बाबुराव चांदेरे काहीही बोलायला तयार नाहीत . विजय रौंदळ हे बांधकाम व्यावसायिक देखील गप्प आहेत , त्यांचे नातेवाईक देखील तोंड उघडायला तयार नाहीत . आणि ज्यांच्यावर कायद्याच्या अंमलबाजवणीची जबाबदारी आहे ते पिंपरी - चिंचवड पोलीसचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड आणि पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना याबाबत विचारला त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिलाय . चांदेरे यांची आम्ही चौकशी करू असं सांगून ते वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतायत . 


बाबुराव चांदेरेंचं कंत्राटदारांशी खास कनेक्शन


राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागील तीन वर्षांपासून झालेल्या नाहीत . त्यामुळं महापालिकांमध्ये प्रशासकांचं राज्य आहे . मात्र बाबुराव चांदेरे पाचवेळा महापालिकेचे नगरसेवक राहिलेत . स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलंय . कोथरूड विधानसभेची निवडणूक देखील त्यांनी लढवलीय .  अजित पवारांचे ते अतिशय विश्वासू मानले जातात .  आपल्या राजकीय संबंधांचा वापर करून नगरसेवक नसताना देखील चांदेरे यांनी पुणे महापालिकेची पन्नास कोटी रुपयांची वेगवगेळ्या कमांसाठीची कंत्राटं त्यांच्या मर्जीतील ठेकेदारांना मिळवून दिलीत . 


* ११ डिसेंबरला पुण्यातील वृत्तपत्रांमध्ये  बाणेर आणि परिसरात  २५ ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकण्याच्या आणि आठ ठिकाणी रस्त्याच्या कामांसाठी अशा एकूण ३३ कामांसाठी ई निविदा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली . 
* १६ डिसेंबरला बाणेर अंडी परिसरातील रस्त्याच्या ८ आणि ड्रेनेजच्या २ अशा एकूण दहा कामांसाठी इ निविदा निघाल्याची आणखी एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली . 
* मात्र ही फक्त औपचारिकता होती . ही सर्व कंत्राटं बाबुराव चांदेरे यांच्या मर्जीतील ठेकेदारांना मिळाली . त्यातील एका ठेकेदाराला विजय रौंदळ यांच्या जागेतून ड्रेनेज लाईनचे काम करायचे होते . मात्र रौंदळ यांनी त्याला आक्षेप घेतल्यानं चांदेरे चिडले आणि त्यांनी रौंदळ यांना उचलून आपटलं . 


चांदेरेंबाबत विचारताच अजित पवारांचं ठोकळेबाज उत्तर 


उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी नेहमीप्रमाणे कोणाचीही गय केली जाणार नाही असं उत्तर दिलं . मात्र, या प्रकरणात कथनी आणि करणीमध्ये अंतर दिसून येतय . आम्ही चांदेरेंना चौकशीसाठी बोलावू असं पिंपरी - चिंचवड पोलीस म्हणतायत . मात्र चांदेरेंच्या अरेरावीची ही कहाणी पहिलीच घटना नाही . लोकांना मारहाण आणि दमदाटी करतानाचे त्यांचे अनेक व्हिडीओ याआधी देखील समोर आलेत.  


बीडच्या मस्साजोग प्रकरणात देखील पोलिसांची ही अशीच भूमिका संशयास्पद ठरली होती . हत्येतील आरोपी असलेल्या वाल्मिक कराडने पोलिसांसमोर हजार राहणायसाठी वेळ आणि ठिकाण स्वतः निवडलं होतं . आरोपी जर पोलिसांसमोर हजर होण्यासाठी अशाप्रकारे स्वतः वेळ आणि ठिकाण ठरवायला लागले तर सामान्यांचा  कायद्यावर विश्वास कसा राहील ? ठिकठिकाणी हे असे रस्ते खोदून ठेवण्यात आलेत . महिनोन महिने उन्हाळी म्हणवणारी ही कामे हिवाळ्यात सुरु आहेत . पण ही अशी कामं पुणेकरांसाठी नाही तर ठेकेदारांसाठी केली जातायत . कारण रस्त्यांवरच्या या कामांमध्ये दडलाय कोट्यवधी रुपयांचा निधी. त्यातून हा प्रकार घडलाय . कोट्यवधी रुपये खर्चून देखील पुणं दिवसेंदिवस का बकाल होत चाललंय याच उत्तर या आशा कामांमध्ये दडलंय.



आणखी वाचा


उचलून आदळलं, डोकं फोडलं; अजित पवारांच्या निकटवर्तीय अन् माजी नगरसेवकाची पुण्यात दादागिरी, कोण आहेत बाबुराव चांदेरे?