पिंपरी चिंचवड :  पिंपरी चिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयाचा आणखी एक प्रताप समोर आलाय. एका कोरोना बाधित रुग्णाकडून तब्बल दीड लाखांचे जास्तीचे बिल रुग्णालयाने आकारल्याचा आरोप आहे. शासनाचे नियम डावल्याचे महापालिकेच्या ऑडिटमधून देखील निष्पन्न झालंय. यासंबंधी रुग्णाच्या नातेवाईकांनी शुक्रवारी (21 मे) वाकड पोलीस आणि महापालिका आयुक्तांकडे रीतसर तक्रार देखील केलीये. पण दोन्ही पातळीवरच्या हालचाली या रुग्णालयावर कारवाई करतील का? अशी शंका उपस्थित करणाऱ्या आहेत. म्हणूनच की काय रुग्णालयाची नेहमीप्रमाणे उद्धटपणाची भाषा सुरूच आहे.


पोपट शिंदे नावाच्या व्यक्तीस 25 एप्रिलला कोरोनाची लागण झाली. उपचारासाठी ते चिंचवडच्या आदित्य बिर्ला रुग्णालयात दाखल झाले. यशस्वी उपचारानंतर 18 मे ला डिस्चार्ज द्यायचं ठरलं, यासाठी रुग्णांचे चिरंजीव प्रशांत शिंदेंच्या हाती बिल देण्यात आलं. बिल होतं तब्बल 6 लाख 66 हजार 381 रुपयांचं. मेडिक्लेम इन्शुरन्स कंपनीने 3 लाख 19 हजार रुपयांची मंजुरी दिली. हे अनपेक्षित होतं, आता जो पर्यंत उरलेली रक्कम भरत नाही, तोवर डिस्चार्ज देणार नाही,अशी अडवणूक रुग्णालयाने केल्याचं नातेवाईकाने तक्रारीत म्हटलं. म्हणूनच महापालिका ऑडिट विभागाकडे धाव घेण्यात आली. संपूर्ण बिलाची छाननी करून 20 मे ला अहवाल तयार झाला. शासनाच्या नियमांना डावलून बिलात अवाजवी रक्कम लावल्याचे दिसून आले. त्यानुसार 1 लाख 55 हजार 523 रुपये बिलातून कमी करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले. पण रुग्णालयाने नेहमीप्रमाणे अडमुठी भूमिका घेत, रुग्णाला डांबून ठेवले. संपूर्ण रक्कम अदा न केल्यास रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होईल अशी अप्रत्यक्षपणे धमकी दिल्याचा आरोप प्रशांत शिंदेंनी तक्रारीत केलाय. या धमकीला घाबरून आम्ही सर्व बिल अदा केल्याचं म्हटलंय. 


पोपट शिंदेंना घरी आणल्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रशांत शिंदेंनी तक्रार करायचं ठरवलं. त्यानुसार शुक्रवारी 21 मे ला पुराव्यानिशी वाकड पोलीस आणि महापालिका आयुक्त राजेश पाटलांकडे तक्रार दाखल केली. आता ही तक्रार दाखल करून आज चार दिवस उलटतील. तरी वाकड पोलिसांनी आणि पालिका आयुक्तांनी अद्याप अपेक्षित हालचाली केलेल्या नाहीत. 


वाकड पोलीस निरीक्षक विवेक मुंगळीकर म्हणतात, आम्ही रुग्णालय आणि पालिकेला स्पष्टीकरण देण्याची नोटीस दिलेली आहे. इन्शुरन्स कंपनीने मंजूर केलेली रक्कम सोडून, उरलेल्या बिलाचे ऑडिट करायला हवे होते. असं शासनाचा नियम असल्याचं रुग्णालयाने सांगितल्याचे तर पालिकेने अद्याप स्पष्टीकरण दिलं नसल्याचं मुंगळीकर सांगतात. तक्रारीनंतर चौथ्या दिवशी पोलिसांचा तपास केवळ इथपर्यंत पोहचलाय.  


पालिका आयुक्त राजेश पाटील म्हणाले शासनाच्या नियमानुसार योग्य ती कारवाई केली जाईल. पण काय आणि कधी हा प्रश्न अनुत्तरित राहतो. कारण ऑडिट नंतर रुग्णालयाने रुग्णाला ती रक्कम परत केली नाहीतर ऑडिट विभाग पुढे काय कारवाई करतं असा प्रश्न एबीपी माझा ने विचारला, तेव्हा ऑडिट विभागाने आरोग्य विभागाकडे बोट दाखवलं. मग हाच प्रश्न आरोग्य विभागाला विचारला तर त्यांनी अपेक्षेप्रमाणे ऑडिट विभागाचे हे काम असल्याचं म्हटलं. 


पोलीस आणि पालिका प्रशासन पातळीवर गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या हालचाली रुग्णालयावर खरंच कारवाई करतील का? अशी शंका उपस्थित करायला वाव देतात. याबाबत आम्ही आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या मुख्य व्यवस्थापिका रेखा दुबे यांच्याशी रुग्णालयात जाऊन संपर्क साधला. आपण ही रक्कम बिलातून कमी केली नाही. म्हणून तुमच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यात आलेली आहे. यावर रुग्णालयाची बाजू सांगावी असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ऑडिट विभागाला आम्हाला जे सांगायचं ते आम्ही सांगितलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाला उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही. अशी नेहमीप्रमाणे वापरली जाणारी उद्धटपणाची भाषा दुबेंनी यावेळी ही वापरली. 


आदित्य बिर्ला रुग्णालय आणि वाद हे समीकरण



  • मे 2021 - बिलाची रक्कम भरत नसल्याने, कोरोना रुग्णाचा मृतदेह तब्बल आठ तास अडवून धरला. शेवटी पोलीस आयुक्तांच्या मध्यस्तीने मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला.

  • ऑगस्ट 2020 - कोरोना योद्ध्यांची पिळवणूक. नर्स, ब्रदर्ससह मेडिकल स्टाफचे काम बंद आंदोलन

  • ऑगस्ट 2018 - मुख्य व्यवस्थापिका रेखा दुबे सह दोघांना अटक झाली होती. आर्थिक दुर्बल घटकातील रुग्ण असताना पैसे उकळण्यासाठी, वृद्धाला डांबून ठेवलं होतं.