पिंपरी चिंचवड : कौटुंबिक वादातून सुनेने सासूचा गळा आळवून हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या तळेगावात घडली. इतकंच नव्हे तर हत्या करुन मृतदेह पोत्यात भरुन शेजारील झुडपातही फेकला. ही फिल्मी स्टाईल घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आणि सुनेचे बिंग फुटले. पोटच्या मुलाचीही बायकोला साथ असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. बेबी शिंदे असं सासूचं नाव होतं. तर पूजा शिंदे असं सुनेचं आणि मिलिंद शिंदे असं मुलांचं नाव आहे. दोघांना तळेगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.


सासू-सुनांमध्ये भांड्याला भांड लागलं नाही तर नवलच मानलं जातं. अपवाद वगळता काही कुटुंब अशी असतात. पण तळेगावमधील शिंदे कुटुंबीय या अपवादात मोडत नव्हतं. सून पूजा आणि सासू बेबी यांच्यात क्षुल्लक कारणावरुन नेहमीच खटके उडायचे. असे वाद झाले की सासू मुलींकडे निघून जायच्या, मग राग शांत झाला की तीन-चार दिवसांनी घरी परतायच्या. हे अनेकदा घडायचं यात पती आणि मुलगा या दोघांचा समतोल राखण्यात मिलिंदही कमी पडत होता. सकाळी दीर कामावर जाताच 21 मे रोजी या वादाची पुनरावृत्ती झाली. यावेळी मात्र वाद शिगेला पोहोचलेला होता. सून चवताळलेली होती, यावेळी सून काहीतरी वेगळं करणार अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली अन् तसंच काहीसं घडलं. सुनेने ब्लाऊज सासूचा गळा आवळला. यात सासूचा मृत्यू झाला.

 

मग ही बाब हत्या करणाऱ्या पत्नीच्या पतीला आणि हत्या झालेल्या आईचा मुलगा मिलिंदला समजली. ही दोन्ही नाती सांभाळण्यात अपयशी ठरलेला मिलिंदने पत्नीची बाजू घेतली. पुरावा नष्ट करण्याच्या कटात तो सामील झाला. मग मृतदेह पोत्यात भरायचं ठरलं, ते पोतं सुरुवातीला टेरेसवर ठेवला. काहीवेळाने घराबाहेर येऊन आजूबाजूला कोणी आहे का? हे वारंवार पाहण्यात येत होतं. लॉकडाऊन असल्याने बाहेर गर्दी कमीच होती. याचाच फायदा घेत, पायऱ्यांवरुन मृतदेह खाली आणला गेला. काळजीपूर्वक रस्ता ओलांडून हे पोतं शेजारच्या झुडपात टाकलं. नंतर पायऱ्यांवर पडलेलं रक्त धुवून घेण्यात आलं.

 

आता आपण ही हत्या पचवली असा त्यांना विश्वास बसला. दीर घरी आल्यावर भांडण झाल्याचं लक्षात आलं. पण प्रत्येकवेळी प्रमाणे आई बहिणीकडे गेली असेल असाच त्याचा समज झाला. मात्र तिच्याशी संपर्क होत नव्हता. दोन दिवसांनी घटनेचा उलगडा व्हायला सुरुवात झाली आणि अशातच सीसीटीव्ही फूटेज समोर आले. सीसीटीव्हीत सुनेने केलेलं कटकारस्थान समोर आलं आणि तिचं बिंग फुटलं. पोटच्या मुलाचा ही सहभाग निष्पन्न झाल्याने संताप व्यक्त केला जातोय. दोघांना तळेगाव पोलिसांनी अटक केली आहे.