पुणे : पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते एकमेकांत भिडल्याने एकच राडा झाला. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर हा सगळा राडा झाला. आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत तब्बल दोन तास गदारोळ सुरू होता. कारखान्याच्या सर्वसाधारण सभेचं निमित्त असले, तरी आगामी विधानसभा निवडणुकीची झालर सुद्धा या सभेला होती. त्यामुळे दोन्हीकडील कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी तणाव वाढू न देता हस्तक्षेप केला. यानंतर कारखान्याची सभा सुरु झाली.
वळसे पाटलांनी स्वतःचा प्रचार केला
अजित पवार गटाचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात विधानसभा लढण्यास इच्छुक असणारे शरद पवार गटाचे देवदत्त निकम या दोघांचे राडा करणारे समर्थक होते. आम्हाला बसू दिलं नाही, मंचावर येऊ दिलं नाही, बैठकीत वळसे पाटलांनी स्वतःचा प्रचार केला, हे सगळं घडवून आणण्यासाठी ते गुंड घेऊन आल्याचा आरोप निकमांनी केला. या मुद्द्यांवरून दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम यांचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. खुर्च्या नाचवत हिणवत होते. यावेळी मंत्री वळसे पाटील यांनी शांततेचं आवाहन केलं, मात्र वेगवेगळ्या कारणांवरून राडा होतच राहिला.
शेवटी पोलिसांनी मध्यस्थी केली अन देवदत्त निकमांना बाहेर जाण्याची विनंती करण्यात आली. यानंतर देवदत्त निकम यांनी आम्हाला सभेतून हकलण्यासाठी गुंड आणल्याचा आरोप केला. मात्र हे सगळे आरोप अजित पवार गटाने फेटाळले. विनाकारण राजकीय रंग देऊन स्वतःची पोळी भाजण्याचे प्रयत्न निकामांनी केल्याचा पलटवार करण्यात आला. देशातील सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या भीमाशंकर कारखान्याच्या वार्षिक बैठकीत हा गदारोळ करून काय साध्य केलं. उलट कारखाना बदनाम करण्याचे प्रयत्न केले. असा पलटवार अजित पवार गटाचे नेते शिवाजी आढळराव पाटील यांनी केला.
इतर महत्वाच्या बातम्या