Ajit Pawar : राज्यासह पुणे जिल्ह्यातील कोरोना रूग्णांमध्ये आता घट होत आहे. पुणे जिल्ह्यात कोरोना रूग्णांमध्ये 51 टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पूर्व प्राथमिक शाळा 2 मार्चपासून सुरू होणार आहेत. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्यात येणार आहेत. पालकांना वाटलं तर त्यांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवावं असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. 


अजित पवार यांनी आज माध्यमांसोबत संवाद साधला. ते म्हणाले, राज्यासह पुण्यातील लसीकरण वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. 1 मार्चपासून पुण्यातील जम्बो हॉस्पिटल बंद होणार आहेत. याबाबत पुणे महापौरांसोबत बोलणं सुरू आहे. टास्क फोर्स आणि डॉक्टरांसोबतही चर्चा झाली आहे. जिल्ह्यातील रुग्ण संख्या पाहता आता जम्बो हॉस्पिटलची गरज वाटत नाही. त्यामुळेच ते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कमी होणारी रूग्णसंख्या पाहाता शाळा सुरू करण्यास काही हरकत नाही. त्यामुळे बालवाडीपासून 12 पर्यंतचे वर्ग 2 मार्चपासून सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. 


"राज्यातील कोरोना रूग्णांमध्येही आता घट होत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना नियम शिथिल करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. 


दरम्यान, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे युक्रेनधील भारतीय लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, बाराशे ते दोन हजार लोक युक्रेनमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे. 366 पालकांना संपर्क साधून त्यांच्यासोबत बोलणं सुरू आहे. त्यांना मोबाईल नंबर आणि ई मेल दिले आहेत. काही जण आज मुबईत पोहचत आहेत. मुख्यमंत्री आणि आम्ही लक्ष देऊन आहोत. युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे  आपले नागरिकांना भारतात परत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकार त्यांना आणण्याचा खर्च करत आहे. त्याबाबत गैरसमज पसरवू नये, असे आव्हान अजित पवार यांनी यावेळी केले. 


6 मार्च रोजी पंतप्रदान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. यावर बोलताना अजित पवार म्हणाले,  विभागीय आयुक्तांनी सागितले की पंतप्रधान मोदी यांचा दौरा आहे. मी पालकमंत्री असल्यामुळे उपस्थित राहणार आहे. मुख्यमंत्री त्यांच्या तब्येतीवरून निंर्णय घेतील, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. 


महत्वाच्या बातम्या