Aaditya Thackeray On Maharashtra Lockdown : राज्यातील कोरोनाचे (Maharashtra Corona Update) आकडे दिवसेंदिवस कमी येत असल्यानं आता पूर्णपणे निर्बंध हटवण्याबाबत चर्चा सुरु आहे. यासंदर्भात राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya Thackeray) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सगळे निर्बंध लवकरच उठवू, कुणाचंही नुकसान होऊ देणार नाही, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. मुंबई पालिकेच्या शाळा दोन मार्चपासून पूर्ण क्षमतेनं सुरु होणार, असल्याची माहिती देखील आदित्य ठाकरेंनी दिली.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क फेस्टिव्हलला (shivaji park festival) कालपासून सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय चळवळीचं मुख्य केंद्र असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्काचा गौरव करण्यासाठी या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. या फेस्टिव्हलच्या निमित्तानं मुंबईकरांना कला, क्रीडा आणि मराठमोळ्या संस्कृतीचा आनंद घेताना महाराष्ट्राच्या इतिहासाचा अनुभव घेता येईल. हा फेस्टिव्हल तीन दिवस सुरु राहणार आहे.
शिवाजी पार्क फेस्टिवलला आदित्य ठाकरेंनी शुक्रवारी रात्री उपस्थिती लावली. यावेळी शिवसेनेचे स्थानिक खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, नवाब मलिकांवरची कारवाई हे भाजपची निवडणूक नीती आहे. नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ केलेल्या आंदोलनात शिवसेनेचेही नेते होते, काहीजण प्रचारात होते, काही आंगणेवाडी जत्रेला गेले होते, पण आम्ही सर्व एक आहोत, असंही ते म्हणाले.
युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांबाबत बोलताना ते म्हणाले की, आम्ही विद्यार्थ्यांना आणि अडकलेल्या नागरीकांना तात्काळ परत बोलवण्याची विनंती केली आहे. पण तो निर्णय भारत सरकारचा आहे.
मुंबईत अखेर पूर्ण क्षमतेनं शाळा सुरु होणार
कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व बोर्डच्या सर्व माध्यमाच्या नगरबाहय विभागाच्या सर्व शाळा तसेच विशेष व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्व शाळा, मैदानी खेळ व शाळेचे विविध शैक्षणिक उपक्रम यासह पूर्णवेळ व पूर्णक्षमतेने सुरु करण्यास मंजुरी प्राप्त झाली आहे. 2 मार्च पासून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा कोविड-19 पूर्वीच्या वेळापत्रकानुसार पूर्णवेळ व पूर्णक्षमतेने ऑफलाईन पद्धतीने सुरु होणार आहेत. यासंदर्भात परिपत्रक बीएमसीकडून जारी करण्यात आलं आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha