Baramati News : वाढदिवस (Birthday) हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खास दिवस असतो. वेगवेगळ्या पद्धतीने हा दिवस आनंदाने साजरा केला जातो. पण वाढदिवसालाचा एका तीन वर्षीय चिमुकल्याला मृत्यूने गाठल्याची दुर्दैवी घटना बारामती (Baramati) शहरात घडली आहे. बारामतीत वाढदिवसाच्या दिवशी तीन वर्षीय मुलाचा अपघाती मृत्यू (Accidental Death) झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. अरद थोरात अस मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे. काल (9 ऑक्टोबर) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.
नेमकी घटना काय घडली?
अरद थोरातचा काल (9 ऑक्टोबर) वाढदिवस होता. वाढदिवस साजरा केल्यानंतर तो रात्री अकराच्या सुमारास आईसोबत बौद्ध मेळाव्यात गाणी ऐकण्यासाठी निघाला होता. हा कार्यक्रम बारामतीतील आंबेडकर पुतळा याठिकाणी आयोजित करण्यात आला होता. बारामती-इंदापूर रस्त्यावर कार्यक्रम स्थळी जाताना वाहतूक वळवण्यात आली होती. शिडी लावून रस्ता बंद करण्यात आला होता. अरद हा त्याच्या आईसोबत रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने एक मोटारसायकल आली. त्या भरधाव वेगाने आलेल्या मोटारसायकलने रस्त्यात आडवी लावलेल्या शिडीला धडक दिली. तिच लोखंडी शिडी अरदच्या डोक्यात लागली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
आरोपी अटकेत, चिमुकल्याच्या मृत्यूने शोककळा
ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. संकेत खळदकर अस भरधाव वेगाने जाणाऱ्या आरोपीचं नाव आहे. अपघाताला कारणीभूत ठरल्याबद्दल आरोपी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करुन बारामती शहर पोलिसांनी या फूटेजच्या आधारावर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. कालच अरदचा वाढदिवस असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यात दिवशी अरद थोरातला मृत्यूने गाठल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. तर चिमुकल्या अरदचा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
लोणावळ्यात तीन महिन्यापूर्वी वाढदिवसाच्या एक दिवस आधीच चिमुकल्याचा मृत्यू
तीन महिन्यांपूर्वी लोणावळ्यातील पुष्पा व्हिला या खाजगी बंगल्यातील स्विमिंग पुलमध्ये बुडून एका वर्षाचा मृत्यू झाला होता. शिवबा अखिल पवार असं मृत चिमुकल्याचं नाव होतं. 13 जुलै रोजी पवार कुटुंब जुळ्या मुलांचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी तुंगार्ली इथल्या पुष्पा व्हिला बंगल्यावर आले होते. इथे स्विमिंग पूलमध्ये खेळण्यासाठी शिवबा पाण्याच्या दिशेने गेला आणि पूलमध्ये पडला. त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. वाढदिवसाच्या एक दिवस आधी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.