Pune Accident News : मुंबई बंगळूर महामार्गावरील नवले पुलावर आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास विचित्र अपघात झाला. या विचित्र अपघातात तीन निष्पाप नागरिकांना प्राण गमवावे लागले. डिझेल संपल्यामुळे रस्त्याच्या मधोमध बंद पडलेला ट्रक नंतर डिझेल टाकून सुरू करत असताना ब्रेक फेल झाले आणि हा कंटेनर सत्तरच्या स्पीडने रिव्हर्स गेला आणि हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास डिझेल संपल्यामुळे एक ट्रक बंद पडला होता. त्यानंतर काही वेळाने ड्रायव्हरने डिझेल आणून ट्रक पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी ट्रकचा ब्रेक फेल झाले आणि हा कंटेनर ताशी 70 च्या वेगाने मागे गेला. मागे जाताना या ट्रकने दोन-तीन वाहनांना धडक दिली. यामध्ये काही दुचाकींचा देखील समावेश आहे. या ट्रक खाली चिरडला गेल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चार ते पाच जण जखमी झाले आहेत.
तीन कारचे नुकसान
ज्या पहिल्या कारला या ट्रकने धडक दिली त्यामध्ये प्रवास करणारे दिल्लीवरून महाबळेश्वरला फिरण्यासाठी आणि नवीन वर्ष सेलिब्रेट करण्यासाठी निघाली होती. तर, दुसऱ्या गाडीमध्ये नवीन लग्न झालेलं जोडपं देवाचे दर्शन घेण्यासाठी कोल्हापूरला निघाले होते. या अपघातात ते किरकोळ जखमी झाले आहेत. तिसऱ्या गाडी मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवासी भोसरीहून कामाच्या निमित्ताने साताऱ्याकडे येण्यास निघाला होता.
नवले पूल होतोय मृत्यूचा सापळा ?
मुंबई बंगलोर महामार्गावरील नवले पुलाजवळील हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.. 2014 पासून आतापर्यंत या परिसरात साठहून अधिक अपघात झाले आहेत. तर आतापर्यंत येथील अपघातात 62 जणांचा मृत्यू झाला आहे. येथील रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, या महामार्गाची पुनर्रचना करण्यात यावी यासाठी स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. परंतु अद्याप यावर कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. प्रत्येक वेळी अपघात झाल्यानंतर येथील रस्त्याचा विषय चर्चिला जातो आणि काही दिवसानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती होते अशी स्थानिकांनी तक्रार केली आहे. लोकप्रतिनिधींनी आतातरी जागे होऊन मुंबई बंगळूर महामार्गावरील या रस्त्याविषयी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.