पुणे : कर्जबाजारीपणाचं, बेरोजगारीचं भांडवल करत तरुण पिढी नको ते उपद्व्याप करताना आपण पाहिलं आहे. त्यांचे विचार बदलायचे कसे? असा प्रश्न अनेकदा आपल्याला पडतो. अगदी समुपदेशन केलं तरी अनेकांवर त्याचे सकारात्मक परिणाम होताना दिसत नाहीत. अशा तरुणांना पिंपरी चिंचवडमधील 80 वर्षीय चंद्रभागा शिंदे या आजींच्या जिद्दीची गोष्ट सांगायला हवी.


चंद्रभागा शिंदे या आजी कर्ज फेडण्यासाठी पिंपरी-चिंचवडजवळच्या आकुर्डीत पाणीपुरी आणि भेळचा व्यवसाय करतात. मुलाच्या डोक्यावरचं कर्ज फेडण्यासाठी त्यांनी हे प्रेरणादायी धाडस केलं आहे. गेल्या तीस वर्षांपासून शिंदे कुटुंबियांचा उदरनिर्वाह हा पाणीपुरी अन भेळच्या व्यवसायावर चालत आला आहे. सगळं अगदी सुरळीत सुरु होतं, पण काही महिन्यांपूर्वी आजींच्या पतीचा अपघात झाला. त्यांना गंभीर इजा झाली. उपचाराचा खर्च पेलवत नव्हता. त्यामुळे मुलाने कर्ज घेतलं. मात्र प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर त्यांनी सर्वांचा निरोप घेतला.


पतीचं निधन झालं आणि अशातच मुलाच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. पण या आजी अजिबात खचल्या नाहीत. आईला टेन्शन येईल म्हणून किती कर्ज घेतलं आहे? याची पुसटशी कल्पनाही मुलाने आईला होऊ दिली नाही. पण मुलाच्या चेहऱ्यावरील तणाव आईने ओळखला. त्यानंतर आईने स्वतंत्र पाणीपुरी आणि भेळचा व्यवसाय सुरु केला.


या 80 वर्षीय आजी दोन महिन्यांपासून आकुर्डीतील रस्त्यावर उभी राहून या व्यवसायातून भांडवल उभं करत आहे. हे पाहून अनेकजण आपुलकीने त्यांच्याकडे येतात. चटकदार पाणीपुरी-भेळ खातात, त्यांची विचारपूस करतात. आजीबाईंची ही जिद्द, चिकाटी अन इच्छाशक्ती पाहून अनेक तरुण-तरुणींना हेवा वाटतोय. यातून मिळणारी प्रेरणा ते या आजींकडे बोलून दाखवतात, हे ऐकून त्यांचे डोळे पाणवतात.


एबीपी माझाने या आजीबाईंशी बातचित केली असता त्यांनी सांगितले की, गेली अनेक वर्षे आम्ही हा व्यवसाय करतोय, पण माझं वय झाल्याने मी घरी बसून पाणीपुरी आणि भेळीसाठी लागणारं साहित्य तयार करण्यात हातभार लावायचे. पण अपघातानंतर पतीच्या उपचारासाठी सर्व पैसा खर्ची घातला, तसेच मुलाने कर्जही काढलं. पण अखेर त्यांचं निधन झालं. कर्जाचं डोंगर डोक्यावर होता. मुलाची अवस्था पाहावत नव्हती. पण मला याचं भांवडल करायचं नव्हतं तर स्वाभिमानाने जगायचं होतं. म्हणून मी स्वतः व्यवसाय सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. हे सांगून भावूक झालेल्या आजींनी हात जोडले.


मी हा व्यवसाय करतेय यात काही चुकीचं तर नाही ना? तुम्ही बातमी करताय याचा मला काही त्रास तर होणार नाही ना? असे प्रतिप्रश्न त्यांनी विचारले. हे प्रश्न विचारत असताना त्यांचा चिंताक्रांत चेहरा दिसला. त्यांची हीच प्रतिमा ग्राहकांनाही भावते. प्रामाणिकपणे कष्ट घेणाऱ्या या आजींकडे लांबून येणारे ग्राहकही दिसले. त्यांची रुचकर पाणीपुरी-भेळ खाऊन मदत करत असल्याचे ग्राहक आवर्जून सांगतात. मुलाच्या डोक्यावर असणाऱ्या कर्जाचं ही माऊली 'भांडवल' करू शकत होती. मात्र स्वाभिमानाने जगणाऱ्या या माऊलीने हा व्यवसाय सुरु केला अन यातून 'भांडवल' उभं करत कर्ज फेडण्यासाठी तिने मुलाला हातभार लावला आहे.


व्हिडीओ पाहा