मुंबई : अपघात झाला आणि जर हाड मोडलं तर अनेकवेळा ग्रामीण भागात आजही ओढणी किंवा लाकडी पट्टी मोडलेल्या भागाला आधार म्हणून वापरतात. या आशा चुकीच्या पद्दतीमुळे थोडावेळ आराम मिळतो. परंतु यातून पुढे मोडलेल्या भागाची सूज वाढण्याची जास्त शक्यता असते. नेमकी हीच बाब लक्षात घेतं पुण्यातील सीओईपीच्या बेटिक विभागाचे संशोधक मयुर सणस यांनी एक स्प्लिंट (फ्रॅक्चर झाल्यानंतर हाताला बांधता येणारं बँडेज) तयार केलं आहे. याचा वापर केल्याने  हात फ्रॅक्चर झाल्यावर हात हलत नाही आणि त्यामुळे होणाऱ्या वेदना कमी होतात. एखाद्या व्यक्तीने  फ्रॅक्चर झाल्यानंतर हे स्प्लिंट हाताला बांधलं तर हात स्थिर राहण्यास त्याला मदत मिळणार आहे. मेडिआशा टेक्नॉलॉजी या कंपनीने हे स्प्लिंट तयार केलं आहे. याला आता ' फ्रॅक्टो एड' असं नाव देण्यात आलं आहे.


यासंदर्भात बोलताना संशोधक आणि मेडिआशा कंपनीचे सीईओ मयुर सणस म्हणाले, "हे स्प्लिंट पोर्टेबल असून हाताला लावणं देखील अगदी सोपं आहे. हे उघडून पाण्यात भिजवयाचंय आणि ते पिळून हातावर लावायचं आहे." मयुर पुढे म्हणाले, "पाण्यात भिजवल्यानंतर याच्या आत असलेले घटक कडक होऊन हाताला घट्ट बसण्यास मदत होते. याशिवाय अनेकदा अपघातानंतर सेंकड इंज्युरी होण्याची शक्यताही जास्त असते. अशावेळी ही या स्प्लिंटमुळे सेकंड इंज्युरी देखील टाळता येते. शाळेतील मुलांसाठी आणि ट्रेकला जाणाऱ्या व्यक्तींसाठी हे खास तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे या स्प्लिंटची चार विविध साईज आहेत. याशिवाय फक्त हात नाही तर पायाला देखील याचा वापर करता येऊ शकतो."

मयुर यांच्या सांगण्यानुसार, "हे स्प्लिंट परवडणाऱ्या दरात म्हणजेचं 300 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत उपलब्ध असणार आहे. सध्या आम्ही शाळा आणि अॅम्ब्युलन्समध्ये देण्याचा विचार करत आहोत. त्यानंतर लवकरच हे बाजारात आणलं जाणार आहे."

प्राथमिक किंवा माध्यमिक शाळांमध्ये अनेकदा विद्यार्थी खेळताना पडला आणि त्याचं हाड मोडलं तर आजाही शिक्षक प्राथमिक उपचार म्हणून ओढणीने मोडलेल्या हाडाला आधार देतात आणि विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांना फोन करुन मुलाला त्याला ताब्यात देतात. आशा घटनांमध्ये ' फ्रॅक्टो एड' नक्कीच वरदान ठरु शकतं, असं मयुर सणस यांचं म्हणणं आहे.

'फ्रॅक्टो एड'साठी ' बेटिक' चा महत्त्वाचा वाटा
बेटिक ही आयआयटी मुंबईत असणारी एक संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमांतून समाजउपयोगी उपकरणांची निर्मिती केली जाते. सध्या या प्रयोगशाळेत देशभरातील काही निवडक डॉक्टर आणि इंजिनीअर विविध विषयांवर संशोधन करत आहेत. बेटिकच्या माध्यमांतून मयुर यांना 'फ्रॅक्टो एड' करता आलं.