पुणे : यंदाची 35 वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा 27 फेब्रुवारी 2022 रोजी रंगणार आहे. देशातील मॅरेथॉन शर्यतीची जननी असलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या आयोजनात कोविडमुळे खंड पडला होता. क्रीडाक्षेत्र ठप्प पडले असल्याने 2020 मध्ये पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन होऊ शकली नव्हती.
सध्या कोविडची साथ ओसरत आहे. तरीदेखील स्पर्धकांच्या आरोग्यविषयक सुरक्षेशी कोणतीही तडजोड न करण्याच्या प्रतिबद्धतेमुळे नेहमीप्रमाणे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारऐवजी पुढील वर्षी 27 फेब्रुवारी रोजी ही शर्यत आयोजित करण्यात येत आहे. पुणे महापालिकेशी योग्य तो समन्वय साधून तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या कोविड सुरक्षेशी संबंधित सर्व नियमांचे काटेकोर पालन करून ही शर्यत होईल, असे पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यतीच्या संयोजन समितीचे अध्यक्ष अॅड. अभय छाजेड यांनी सांगितले.
या शर्यतीसाठी 15 ऑक्टोबरपासून ऑनलाइन नाव नोंदणीला सुरुवात होईल असं सांगून रेस डायरेक्टर सुमंत वाईकर म्हणाले की, "शर्यतीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी www.marathonpune.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. तेथे शर्यतीसंदर्भातील सर्व माहिती उपलब्ध असेल. 31 जानेवारीपर्यंत नाव नोंदणी करता येईल. 30 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करणाऱ्या स्पर्धकांना आकर्षक अर्ली बर्ड डिस्काउंट देण्यात येईल. याबाबतची सविस्तर माहिती वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल."
या स्पर्धेसाठी 10 किंवा त्यापेक्षा जास्त जणांच्या समूहाने एकाच वेळी नोंदणी केल्यास त्यांना मोठी सूट मिळेल. यासाठी त्यांनी office.pimt@gmail.com या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा. सणस ग्राउंड ते नांदेड सिटी या नव्या मार्गावर दोन लूपमध्ये ही शर्यत होईल अशी माहिती शर्यतीचे टेक्निकल डायरेक्टर बाप्टिस्ट डिसुझा यांनी दिली.
व्हॅक्सिनेशन पूर्ण केलेल्या 18 वर्षांपुढील स्पर्धकांनाच एन्ट्री
पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनने खेळाडूंच्या सुरक्षेला कायम प्राधान्य दिले आहे. यावेळी कोविड काळात खेळाडूंच्या सुरक्षेकडे आम्ही आणखी काटेकोरपणे लक्ष देणार आहोत. या शर्यतीदरम्यान शासकीय नियम आणि खेळाडूंचे आरोग्य, याविषयी कुठलीही तडजोड केली जाणार नाही. व्हॅक्सिनेशन पूर्ण केलेल्या म्हणजे लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या 18 वर्षांपुढील खेळाडूंनाच यंदाच्या शर्यतीसाठी प्रवेश दिला जाईल, असे पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यतीच्या संयोजन समितीचे अध्यक्ष अॅड. अभय छाजेड यांनी स्पष्ट केले.
अशी होईल कोविड सेफ मॅरेथॉन
कोविडविषयक सुरक्षेशी कोणतीही तडजोड न करता यावेळची पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन होईल. शर्यतीच्या मेडिकल कमिटीचे चेअरमन डॉ. राजेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली उपलब्ध असलेली वैद्यकीय टीम खेळाडूंच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेईल, असे पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यतीचे सहसंचालक रोहन मोरे यांनी सांगितले. शर्यत सुरक्षितपणे पार पडावी, यासाठी खालील उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
- व्हॅक्सिनेशन पूर्ण केलेल्या 18 वर्षांपुढील स्पर्धकांनाच शर्यतीत सहभागी होता येईल.
- नावनोंदणी केलेल्यांना रनिंग किट घरपोच मिळेल.
- शर्यतीच्या मार्गावरील प्रत्येक पॉईंटवर सॅनिटायझेशन युनिट आणि तापमान मोजण्याची सुविधा उपलब्ध असेल.
- प्रत्येक गटाची शर्यत वेगळी सुरू होईल.
- केवळ एलिट गटाचा फ्लॅग ऑफ होईल. इतर गटांतील स्पर्धक आखून दिलेल्या कालावधीत त्यांच्या सोईनुसार शर्यत सुरू करू शकतील.
- यावेळी कंबाईन वॉर्मअप आणि कंबाईन कुलडाऊन न ठेवता खेळाडूंना हे वैयक्तिक स्तरावर करावे लागेल.
- शर्यत संपल्यानंतर मेडल आणि इतर गोष्टींचा समावेश असलेले पोस्ट रन किट तसेच नाश्त्याचे पार्सल देण्यात येईल.
- पारितोषिक वितरण होणार नाही.
- विजेत्या खेळाडूंची ट्रॉफी घरपोच पाठवण्यात येईल. विदेशी खेळाडूंची ट्रॉफी त्यांच्या निवासस्थानी पोहचविण्यात येईल.
यंदा 18 वर्षांखालील खेळाडूंना प्रवेश नाही
पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये कुमार आणि युवा धावपटू मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. मात्र कोविडविषयक सुरक्षानियम ध्यानात घेता यंदा 14, 16 आणि 18 वर्षांखालील गटाच्या शर्यती होणार नाहीत. केवळ 18 वर्षे वयोगटापुढील स्त्री-पुरुष स्पर्धकांसाठी 42 किलोमीटर, 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि व्हीलचेअर या केवळ पाच गटांच्याच शर्यती यंदा होतील, अशी माहिती पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यतीच्या सहसंचालक गुरुबन्स कौर यांनी दिली.
शर्यत फी ऑफर फी*
42 किमी ₹ 2,000 ₹ 1500
21 किमी ₹ 1500 ₹ 1200
10 किमी ₹ 1200 ₹ 1000
5 किमी ₹ 1000 ₹ 800
व्हीलचेअर ₹ 100 ₹ 100
टीप : डिस्काउंट ऑफरचा लाभ 30 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करणाऱ्यांनाच मिळेल.
महत्वाच्या बातम्या :