Shivsena Dasara Melava 2021 : शिवसैनिकांसाठी विचाराचं सोनं लुटण्याचा दिवस म्हणजे, दसरा मेळावा. पण सलग दुसऱ्या वर्षी शिवतीर्थावर दसरा मेळावा होणार नाही. पण शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जागा निश्चित झाली आहे. शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावादेखील हॉलमध्येच होणार आहे. मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहामध्ये 50 टक्के उपस्थितीत दसरा मेळावा होणार आहे. मेळाव्याला मुंबईतले काही नगरसेवक, आमदार, शिवसेनेचे वरिष्ठ नेते, मंत्री, उपनेते तसंच महापौर उपस्थित राहणार आहेत. सामान्य शिवसैनिकांना या दसऱ्या मेळाव्याला उपस्थित राहता येणार नाही. त्यात शिवसेना वरिष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) दसरा मेळाव्यात उपस्थित राहणार का नाही याबद्दल अनेक चर्चा आहेत.


माजी मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ रामदास कदम यांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे जुने विरुद्ध नवीन शिवसेना असा वाद पुन्हा रंगला असून या वादावर मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र मिळालेल्या माहितीनुसार या सर्व प्रकरणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलेच संतापले असून, रामदास भाईंवर पक्षांतंर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची चर्चा होती . त्या कथित ऑडिओ क्लिपची शहानिशा करून रामदास कदम यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे समजत होते. मात्र यावर अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. त्यात आता दसरा मेळावा आहे. यावेळी रामदास कदम यांना बोलावलं नसेल अशी देखील चर्चा सुरु आहे. 


रामदास कदम हे शिवसेचे ज्येष्ठ नेते असून, माजी मंत्री देखील राहिले आहेत. त्यांची अशा प्रकारे कथित ऑडिओ क्लिप बाहेर येणे योग्य नसल्याची भावना काही शिवसेनेच्या नेत्यांची आहे. त्यामुळे जर आता रामदास कदम यांच्यावर कारवाई केली तर पक्षात यापुढे असे कृत्य करणाऱ्यांवर जरब बसेल असे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे. याचमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रामदास कदम यांच्यावर कारवाई करण्याची दाट शक्यता आहे.  रामदास कदमांच्या कथित ॲाडिओ क्लिपमुळे पक्ष बदनाम होत असल्याची भावना देखील शिवसेनेच्या काही नेत्यांची आहे. त्यामुळे या दसरा महामेळाव्याला रामदास कदम यांना इंट्री नसेल असाही काही शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे.


नुकतीच रामदास कदम यांची कथित ऑडिओ क्लिप समोर आली होती. त्याआधी कोकणातील अनंत गीते यांनी शरद पवार यांच्यावर टीका करत महाविकास आघाडीत दुफळी निर्माण केली होती. याचमुळे या दोन्ही नेत्यांवर सध्या शिवसेनेत नाराजी आहे. बाळासाहेबांच्या काळातले हे शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये अडचण निर्माण करत आहेत? एवढी मंत्री पदे मिळूनही माजी मंत्री पक्षाला बदनाम का करत आहेत? असा सवाल आता काही शिवसैनिक विचारू लागले आहेत. त्यामुळे शिवसेनेतील पदाधिकारी आणि आताच्या शिवसेना नेत्यांची या बदनाम करणाऱ्या नेत्यांना मेळाव्याला बोलावू नका अशी भूमिका आहे. त्यामुळे या दसरा मेळाव्याला रामदास कदम व अनंत गीते यांना यांना इंट्री मिळणार का हादेखील प्रश्न उपस्थित राहत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जागा अखेर ठरली, 'या' ठिकाणी होणार मेळावा?