मुंबई : पुणे मेट्रो प्रकल्पासाठी युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक सुमारे 4800 कोटीचा ( 600 दशलक्ष युरो) वित्त पुरवठा करणार असून त्याच्या पहिला हप्ता 1600 कोटी (200 दशलक्ष युरो) देण्यासंदर्भातील सामंजस्य करार पुणे मेट्रो आणि युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक यांच्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या सहकार्यामुळे पुणे मेट्रो प्रकल्पाला चालना मिळणार असून भविष्यात इतरही प्रकल्पांना युरोपियन बँकेने सहकार्य करावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित व बँकेचे उपाध्यक्ष अँड्र्यू मॅकडोवेल यांनी करारावर स्वाक्षरी केली.


उद्धव ठाकरे म्हणाले की, बँकेने केलेल्या या सहकार्यामुळे या प्रकल्पाला चालना मिळणार असून पुणे मेट्रो लवकर कार्यान्वित होण्यास मदत होईल. या प्रकल्पामुळे पुणे व आसपासच्या परिसरातील वाहतुकीत प्रभावीपणे सुधारणा होईल आणि पुणे शहराच्या विकासास हातभार लागेल. पुणे मेट्रोची भौतिक प्रगती सध्या 37% तर आर्थिक प्रगती 29.53% झाली आहे. बँकेने दिलेल्या निधीचा वापर मेट्रोच्या भुयारी मार्ग, डेपो कामांसह इतर कामांसाठी केला जाईल.

Pune Metro | पुणेकरांसाठी खूशखबर, बहुप्रतिक्षित मेट्रोचे कोच पुण्यात दाखल | ABP Majha



युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेची महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील गुंतवणूक विकास आशादायक आहे. पुणे मेट्रोबरोबरच नाशिक मेट्रोसाठी व पर्यावरण संवर्धनाच्या प्रकल्पांसाठी अर्थसहाय्य करण्यासाठी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

नगर विकास मंत्री शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने पुणे, मुंबई मेट्रो बरोबरच राज्यात अनेक मोठे प्रकल्प सुरू केले आहेत. मुंबईत 80 टक्के नागरिक हे सार्वजनिक वाहतुकीचा विशेषतः लोकलचा वापर करतात. त्यामुळे मेट्रो सारखे प्रकल्प सुरू केले असून हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. या मेट्रो प्रकल्पामुळे पुणे, मुंबईचा चेहरामोहरा बदलणार आहे.

पुणे मेट्रो वैशिष्ट्ये :

  •   पुणे मेट्रो रेल प्रकल्प हा महत्वाकांक्षी नागरी वाहतूक सुविधा प्रकल्प

  •  महामेट्रोमार्फत 50:50 टक्के केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त भागीदारीमध्ये प्रकल्प राबविण्यात येत आहे.

  •  23 जानेवारी 2017 रोजी प्रकल्पाचे काम सुरू

  •  हा प्रकल्प हा 32.5 कि.मी. मार्गिकेचा असून त्यामध्ये 30 स्टेशन आहेत.

  •  प्रकल्पाचा एकूण खर्च रू. 11,420 कोटी इतका अपेक्षित आहे.

  •  केंद्र शासन व राज्य शासन यांच्या सहाय्याने ए.एफ.डी. फ्रान्स व युरोपियन इनव्हेस्टमेंट बँकेमार्फत प्रकल्पास आर्थिक कर्ज पुरवठा