नागपूर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पोर्टलवर नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ऑनलाईन केवायसी (खात्याबद्दलची प्रमाणित माहिती) नोंदविण्यासाठी 31 जुलै 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विशेष जनजागृती मोहीमेअंतर्गत केवायसी पूर्ण करण्याबाबत केंद्र शासनाने मुदत वाढ दिलेली आहे. आपण लाभार्थी असल्याची खातरजमा व योग्य माहिती नोंदवण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. त्यानुषंगाने जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना खात्यावर योग्य ग्राहक नोंदणी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करुन दिलेले आहेत.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी http://pmkisan.gov.on या संकेतस्थळावरील फार्मर कॉर्नर या टॅब मध्ये किंवा पीएम किसान ॲपद्वारे ओटीपीद्वारे लाभार्थीना स्वत: ऑनलाईन केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल, तसेच ग्राहक सेवा केंद्रावर ऑनलाईन प्रमाणीकरण बायोमॅट्रिक पध्दतीने करता येईल. केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्रावर बायोमॅट्रिक पध्दतीने प्रमाणीकरण करण्यासाठी प्रती लाभार्थी प्रती बायोमॅट्रिक प्रमाणीकरण दर 15 रुपये फक्त निश्चित करण्यात आला आहे.
केवायसी पूर्ण कराः जिल्हाधिकारी
पी.एम. किसान योजनेंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना पुढील कालावधीचा लाभ प्राप्त होण्यापूर्वी ऑनलाईन केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असून 31 जुलै 2022 अखेरपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांनी ती पूर्ण करावी, असे जिल्हाधिकारी आर. विमला यांनी कळविले आहे.