नागपूर : 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनाला कस्तुरचंद पार्कवर सकाळी 5 .30 वाजता पासून विविध कार्यक्रमात व योग प्रात्यक्षिकामध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे मैसूर कर्नाटक येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहे. यावेळी ते देशवासीयांशी संवाद देखील साधणार आहे. नागपूर येथून केंद्रीय दळणवळण व महामार्ग मंत्री नितिन गडकरी या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी असतील. दूरदर्शनवरही हा कार्यक्रम लाईव्ह दाखविला जाणार आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या सर्व यंत्रणा यामध्ये सहभागी होत असून नागरिकांनी मोठ्या संख्येने कस्तुरचंद पार्कवर सकाळी साडेपाच वाजता पासून उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे महा व्यवस्थापक व प्रकल्प संचालक एन. एल. येवतकर यांनी केले आहे.
सन 2015 पासून 21 जून हा संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय 'योग दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी 21 जून 2022 ला आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षात येत असल्याने केंद्रीय आयुष्य मंत्रालयामार्फत देशभरातील 75 प्रसिद्ध स्थळांवर साजरा करण्यात येणार आहे. देशभरातील 75 प्रसिद्ध स्थळांमध्ये देशाचा मध्यभाग असणाऱ्या 'झिरो माईल्स'च्या नागपूरचीही  निवड झाली आहे. केंद्रीय दळवळण व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्या मार्गदर्शनात नागपूरमध्ये भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या पुढाकाराने हा आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम कस्तुरचंद पार्क येथे आयोजित करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील नागपूर शिवाय त्र्यंबकेश्वर मंदिर नाशिक येथून गृहमंत्री अमित शहा, मरीन ड्राइव्ह मुंबई येथून वाणिज्य मंत्री पीयुष गोयल, फुगेवाडी मेट्रो स्टेशन पुणे येथून केंद्रीय मंत्री नारायण राणे सहभागी होणार आहेत. अशाच प्रकारे देशभरातून आयुष 75 प्रसिद्ध स्थळांवरून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सदस्यांच्या सहभागात योग दिन आयोजित करण्यात येणार आहे.  


सकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन


त्यामुळे 21 जून रोजी सकाळी 5.30 पासून नागरिकांनी गोळा व्हायचे आहे. सकाळी 6 ते 6.40 कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सकाळी 7.40 ला प्रधानमंत्री संबोधित करणार आहे. तर सकाळी 7 ते 7.45  योगाभ्यासाची प्रात्यक्षिके होणार आहे. यावर्षी योग दिवसासाठी 'योगा फार ह्युमॅनिटी' ही संकल्पना ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने यासाठी कस्तुरचंद पार्कवर 21 जूनला सकाळी 5.30 वाजता पोहचण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. आज या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे यांच्या मार्गदर्शनात बैठक पार पडली. बैठकीला विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.


पीआयबी कार्यालयातर्फेही विविध स्पर्धा


नागपूर : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर आणि राष्टीय मृदा सर्वेक्षण व भूमि उपयोग नियोजन ब्युरो, अमरावती रोड, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने 20 व 21 जून रोजी कम्युनिटी हॉल, कृषीकुंज, बजाज नगर, येथे दोन दिवसीय विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 20 जून रोजी सकाळी 10.00 वाजता पासून रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे. 21 जून रोजी सकाळी 7 ते 8.30 च्या दरम्यान योग प्रशिक्षकाकडून कडून आरोग्याच्या रक्षणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रात्याक्षिक दाखवून उपस्थितांकडून योगासने करून घेण्यात येतील. या प्रसंगी भारतीय कृषि अनुसंधान संस्थान, राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भुमि उपयोग नियोजन ब्युरोचे निर्देशक डॉ. बी. एस.द्विवेदी आणि प्रधान वैज्ञानिक डॉ. एम.एस. रघुवंशी उपस्थित राहणार आहेत. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे, असे केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय यांनी कळविले आहे