नागपूरः नागरिकांमध्ये महिला सुरक्षा, सांप्रदायिक सौहार्द तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याच्या उद्देशाने नागपूर शहर पोलिसांच्यावतीने रविवारी सायक्लॉथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
काटोल मार्गावरील पोलिस मुख्यालयाच्या शिवाजी स्टेडिमवर पालकमंत्री डॉ. नितीन राऊत आणि पोलिस आयुक्त अमितेश कुमार सायक्लॉथॉनला हिरवी झेंडी दाखविणार आहे. सायक्लॉथॉनचा मार्ग 12 किलोमीटरचा राहणार आहे. सकाळी 6 वाजता सायकलस्वार स्टेडियमवर गोळा होती. येथे झुंबा, ढोल पथक तसेच मनोरंजनपर कार्यक्रम सादर होणार आहेत. शिवाजी स्टेडियम येथून रवाना झाल्यानंतर सायकलस्वार जपानी गार्डन, लॉ कॉलेज, शंकरनगर चौक, महाराजबाग चौक या मार्गाने परत येणार आहेत. त्यानंतर समारोपीय कार्यक्रमात विजेत्यांना पुरस्कार, पदक आणि प्रमाणपत्र देण्यात येईल.
आज सकाळी 9 ते सायंकाळी 7 दरम्यान एक्स्पो
आज शनिवारी लेडीज क्लब चौकातील पोलिस भवनात एक्स्पोचे आय़ोजन करण्यात आले आहे. एक्स्पोमध्ये नागरिकांना पोलिसांच्या कामकाजाची माहिती देण्यात येईल. यात पोलिस वापरत असलेले अत्याधुनिक शस्त्रांचे प्रदर्शन, बॉम्ब शोधक व नाशक पथक, शीघ्र कृती दल, श्वान पथक, वाहतूक पोलिस, वायरलेस पथक तसेच सायबर सेलच्या कामकाजाची माहिती देण्यात येईल. एक्स्पोदरम्यान नागरिक पोलीस बँडच्या सुमधूर संगीताचा आनंद घेऊ शकणार आहेत. अशा आयोजनामुळे पोलिस आणि नागरिकांमधील संबंध मजबूत होणार असून ही पोलिसांना समजून घेण्याची चांगली संधी असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. एक्स्पो तसेच सायक्लॉथॉनमध्ये सहभागी होऊन पोलिसांचे मनोबल वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले.