नागपूरः झटपट पैसे मिळविण्यासाठी आजही मांत्रिकाच्या चरणी लाखो रुपये अर्पण करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याचे दैनंदिन समोर येणाऱ्या घटनांवरुन दिसून येत आहे. याच प्रकारात पूजा केल्यानंतर एका लाखाच्या मोबदल्यात एक कोटी रुपये मिळविण्याच्या नादात एका ठेकेदाराला 7.11 लाख रुपये गमवावे लागले. अजनीच्या चुनाभट्टी परिसरात ही घटना घडली. धंतोली पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केल आहे.


जाफरनगर येथील रहिवासी आरीफुद्दीन काजी (वय 49) हे बांधकाम ठेकेदार आहेत. त्याचे चुनाभट्टी परिसरात कार्यालय आहे. त्यांची महाराज नावाच्या एका व्यक्तीशी मैत्री आहे. महाराजने काजी यांना यवतमाळच्या वणी येथील तांत्रिक विशेष पूजा करुन एका लाखाच्याबदल्यात एक कोटी रुपये देत असल्याची माहिती दिली. त्याच्यावर विश्वास ठेवून काजी 7 जूनला वणी येथे गेले. तेथे पंकज (वय 50) नावाच्या व्यक्ती आणि त्याच्या साथीदाराशी त्यांची भेट झाली. दोघेही काजी आणि महाराज यांना आपल्या दाव्यावर विश्वास पटवूनदेण्यासाठी स्मशानात घेऊन गेले. तेथे त्यांनी पूजा करण्याचे नाटक केले. पंकजने काजी यांना त्यांच्या कार्यालयात येऊन पूजा करण्याचे आश्वासन दिले. त्याने काजी यांना रोख रकमेची व्यवस्था करण्यास सांगितले. ठरलेल्या योजनेनुसार बुधवारी पंकज आपल्या साथीदारासह नागपूरला आला. काजीने आपल्या मित्रांकडून 7.11 लाख उसने घेतले होते. पंकज आणि त्याच्या साथीदाराने काजी यांना ही रक्कम पूजेत ठेवण्यास सांगितले. दोघांनीही कार्यालयात पूजा करण्याचे नाटक केले.


नोटांवर ठेवला लाल कापड


नोटांवर लाल कापड ठेवून पैसे झाकल्यानंतर फूल आणि लिंबू ठेवले. काही वेळानंतर पूजा संपणार असल्याचे सांगून लिंबू स्मशान घाटात ठेवण्याची बतावणी केली. काजी दुपारी 3.30 वाजता दोघांना कारमध्ये बसवून मोक्षधाममध्ये आले. येथे कार उभी केल्यानंतर पंकज आणि त्याचा साथीदार फरार झाला. तेकार्यालयात परतले. त्यांना पूजा केलेल्या जागेवर 7.11 लाखाच्या एवजी खेळण्यात वापरत असलेल्या बनावट नोटा आढळल्या. त्यानंतर त्यांनाआपण फसविले गेल्याची जाणी झाली. त्यांनी धंतोली ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. काजी यांचा मित्र महाराज हा पंकज आणि त्याच्या साथीदाराची माहिती नसल्याचे सांगत आहे, हे विशेष.