मुंबई: काँग्रेस पक्षाचे माजी नेते बाबा सिद्दीकी यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशापूर्वी अजितदादांनी बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान यांच्या कार्यालयाला दिलेली भेट चांगलाच चर्चेचा विषय ठरली. झिशान सिद्दीकी यांनी अजितदादा कार्यालयात आल्यानंतर ज्याप्रकारे लगबगीने त्यांनी सरबराई केली ती पाहता अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यामुळे झिशान सिद्दीकीही काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, झिशान यांनी आपण काँग्रेस पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. परंतु, यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या काळात मिळालेल्या सापत्न वागणुकीविषयी आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली. विशेषत: उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून मिळालेल्या वागणुकीविषयी झिशान यांनी खंत व्यक्त केली.


मी आदित्यला मित्र समजत होतो पण... झिशान सिद्दीकी काय म्हणाले?


झिशान सिद्दीकी यांनी आदित्य ठाकरे यांच्याविषयी नाराजी व्यक्त करताना म्हटले की, आदित्य ठाकरेंचे वर्तन पाहून मला आश्चर्य वाटायचे. मविआ सरकारच्या पहिल्या वर्षात आदित्य ठाकरे हे आमच्या मैत्रीच्या नात्यात प्रो-अॅक्टिव्ह होते. पण त्यानंत आदित्य यांचा स्वभाव बदलत गेला. एकमेकांना फक्त मित्र म्हणणं पुरेसं नसतं. मी अनेकदा मंत्री किंवा अन्य नेत्यांकडे काही कामासाठी जायचो तेव्हा ते म्हणायचे 'तुम्ही तुमच्या मित्राला सांगा ना.' ते ऐकून माझी अवस्था विचित्र व्हायची. मी आदित्यला मित्र मानयचो, पण त्याच्याकडून तसा प्रतिसाद मिळत नव्हता. नंतरच्या काळात आदित्य पालकमंत्री होता. तरीही माझा किंवा अन्य कोणाचाही फोन आदित्य उचलायचा नाही. मी त्याला जवळपास ५० वेळा कॉल केले पण आदित्य ठाकरेंनी एकदाही माझा फोन उचलला नाही. मी कार्यक्रमात भेटल्यावर आदित्यला बोलायचोही, आदित्य यार माझा फोन तरी उचल. मी तुला इतर कोणत्या गोष्टीसाठी फोन  करतो का? माझ्या कामासाठी फोन करतो, असे मी त्याला बोललोही. पण जाऊ दे, आदित्य कदाचित खूप बिझी माणूस असेल,असे झिशान सिद्दीकी यांनी म्हटले.


पूर्वीचे मुख्यमंत्री माझ्या ऑफिसजवळ कार्यक्रम घ्यायचे पण मला निमंत्रण नसायचं: झिशान सिद्दीकी


यापूर्वी एक मुख्यमंत्री असे होते की, माझ्या ऑफिसजवळ कार्यक्रम ठेवायचे, पण त्या कार्यक्रमाचं मला निमंत्रण नसायचं. मी त्यांना भेटायचो तेव्हा ही गोष्ट बोलून दाखवायचो. एकदा तर जाहीर भाषणातही मी त्यांना मलाही मतदारसंघातील कार्यक्रमांचे निमंत्रण देत जा, असे सांगितले होते. अनेकदा माझ्या वाट्याचा निधीही शिवसेनेच्या दुसऱ्या एखाद्या आमदाराला दिला जात असे. मी त्यावेळी आवाज उठवायचो पण काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते मला साथ द्यायचे नाही. मात्र, त्यावेळी अर्थमंत्री असलेले अजित पवार मला मदत करायचे, असे झिशान सिद्दीकी यांनी सांगितले.


आणखी वाचा


अजितदादांच्या सरबराईसाठी लगबग, ऑफिसवरचा पक्षाचा बोर्डही काढला; झिशान सिद्दीकीही काँग्रेस सोडणार?


पक्ष सोडला नाही, पण झिशान सिद्दीकींनी मनातली सगळी खदखद बोलून दाखवली, म्हणाले...