Zeeshan Siddique : मुंबई: वांद्रे परिसरातील काँग्रेस पक्षाचे माजी नेते बाबा सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांनी शनिवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशापूर्वी अजित पवार (Ajit Pawar) यांनी वांद्रे येथील झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयात जाऊन पितापुत्रांची भेट घेतली. अजित पवार कार्यालयात आल्यानंतर झिशान सिद्दीकी यांनी त्यांचा अगत्याने पाहुणचार केला. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या गेल्या. थोड्यावेळ्यासाठी झिशान सिद्दीकीही आजच वडिलांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का, अशी शंका अनेकांच्या मनात निर्माण झाली. मात्र, बाबा सिद्दीकी आणि अजित पवार कार्यालयातून निघून गेल्यानंतर झिशान यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा कोणताही विचार नसल्याचे सांगितले. मात्र, यावेळी झिशान सिद्दीकी यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात कार्यक्रमांच्या निमंत्रणांपासून ते निधीवाटपात आपल्याबाबत कशाप्रकारे दुजाभाव झाला, याविषयीची खदखद बोलून दाखवली. एवढेच नव्हे तर काँग्रेसमधील वरिष्ठ नेतृत्त्वाच्या बोटचेप्या भूमिकेबद्दलही नाराजी व्यक्त केली.


'एबीपी माझी'शी बोलताना काय म्हणाले झिशान?


बाबा सिद्दकी यांना शुभेच्छा असतील ते माझे वडील आहेत. त्यांच्यासाठी आजचा दिवस मोठा आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे माझ्या कार्यालयात आलेत ही आनंदाची गोष्ट आहे. मी सध्या काँग्रेस पक्षातच आहे. यापूर्वी एक मुख्यमंत्री होते. ते माझ्या कार्यालयाजवळ कार्यक्रम ठेवायचे पण मला निमंत्रण देखील नसायचं, अशी खंत झिशान सिद्दकी यांनी बोलून दाखवली आहे. मी काँग्रेस नेतृत्वाकडे याबाबत हा मुद्दा घेऊन गेलो होतो. या जागेवर शिवसेनेची म्हणजेच ठाकरे गटाची नजर आहे. आपण फार काही करु शकत नाही, असे स्पष्टपणे सांगितले होते. मात्र, वरिष्ठ नेते तरुण आमदाराला पाठबळ देत नसतील तर दुर्दैवाची गोष्ट आहे. पण तरीही मी काँग्रेसमध्येच आहे. 


झिशान सिद्दकी म्हणाले, "महाविकास आघाडी सांभाळण्याच्या नादात काँग्रेस पक्षाचे नुकसान होत आहे. मी जेव्हा आवाज उठवायचो अन्यायाविरोधात तेव्हा काँग्रेसचे वरिष्ठ नेते साथ देत नाहीत. पण अजित पवारांनी मला अर्थमंत्री असताना मदत केली. मी टर्म संपणार म्हणून वाट बघत नाही, मी काँग्रेस पक्ष सोडण्याच्या विचारात नाही. माझे वडील आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. राहुल गांधी यात्रेत बिझी आहेत. वरिष्ठ नेत्यांशी बोलतोय, पण त्यांचे हात बांधलेले आहेत. संजय निरुपम यांच्याबाबत बोलताना सिद्दकी म्हणाले, आम्ही गल्लीतील नेत्यांशी बोलत नाही, दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी बोलतो. त्यामुळे स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची होते", असे झिशान सांगितले.  


इतर महत्वाच्या बातम्या 


Zeeshan Siddique : अजितदादांच्या सरबराईसाठी लगबग, ऑफिसवरचा पक्षाचा बोर्डही काढला; झिशान सिद्दीकीही काँग्रेस सोडणार?